निमंत्रित नेते ऐनवेळी दांडी मारण्याचे संकेत

बहुजन विचार मंचच्या वतीने भंडारा-गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे आणि माजी खासदार व काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार कार्यक्रम उद्या शनिवारी नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम म्हणजे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्यावर कुरघोडी असून या सत्काराआडून पटोलेंच्या लोकसभा उमेदवारीच्या दावेदारीला बळ दिले जात असल्याची चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमात शहरातील एका गटातील काँग्रेस नेत्यांनाच निमंत्रित करण्यात आले आहे, परंतु पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी गटबाजी खपवून घेणार नाही, असा खणखणीत इशारा याआधीच दिल्याने निमंत्रित नेते ऐनवेळी दांडी मारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे विजयी झाले होते. या निवडणुकीत सर्वपक्षीय बहुजन एकत्र आल्याने भाजपचा पराभव झाला, असा दावा आजही केला जातो. यामुळे राष्ट्रवादीने जागा जिंकूनही नाना पटोले यांना बरेच श्रेय देण्यात आले. या पाश्र्वभूमीमुळे नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच आपले पुढील लक्ष्य असल्याचे जाहीर केले होते. पटोले यांनी नागपुरातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने नागपुरातील बहुजन विचार मंचच्या बॅनरखाली सत्कार समारंभ घडवून मुत्तेमवारविरोधात बहुजनांचे शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन करण्यात आले.

काँग्रेसमधील या गटाने राष्ट्रवादीला सोबत घेतल्याचीही चर्चा आहे. त्यांनी या समारंभाला माजी मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी निमंत्रण देऊन बहुजनांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमाला विदर्भातील काँग्रेसचे सर्व मुत्तेमवारविरोधी नेत्यांना तसेच इतरही नेत्यांना निमंत्रण देण्यात आले, परंतु शहरातील काँग्रेसच्या मुख्य गटाला डावलून हा कार्यक्रम होत असल्याने अनेक आमदार या कार्यक्रमाकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे. तसेच संकेत विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी दिले आहेत. एका आमदाराने तर राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवाराचा सत्कार काँग्रेसचा एक गट करतोय, अशा शब्दात टिंगल उवडली. ते म्हणाले, हा प्रकार म्हणजे शेजाऱ्याला मुलगा झाला म्हणून आपण पेढे वाटण्यासारखा आहे. पश्चिम विदर्भातील आणखी एका आमदाराने तर बहुजनांच्या नावावर गटबाजी करण्यापेक्षा आगामी निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी सर्वानी एकदिलाने कार्य करून राहुल गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटावे, अशी कानउघाडणी केली.