शहरातील विविध प्रकल्पांचे प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी आले की त्यावर चर्चा होऊन त्यानंतर प्रस्तावाला मंजुरी दिली जाते. मात्र, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकास कामांच्या कोटय़वधी रुपयांच्या  ४८ प्रस्तावाला कुठलीही चर्चा न करता केवळ २० मिनिटांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे समितीच्या बैठकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेत प्रत्येक महिन्यात  स्थायी समितीच्या बैठकी होऊन त्यात शहरातील विविध विकास कामांना चर्चा करत मंजुरी दिली जाते. जे प्रस्ताव वादग्रस्त असतात त्यावर समितीमधील काँग्रेसह अन्य पक्षाचे सदस्य विरोध करत असल्यामुळे ते स्थगित ठेवले जातात. मात्र, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ४८ प्रस्ताव मंजुरीसाठी आले अन् निवडक सदस्यांच्या उपस्थितीत कुठलीही चर्चा न करता मंजूरही झाले. या बैठकीत सध्या गाजत असलेल्या बास्केटबॉल महापौर चषक क्रीडा स्पर्धेवरील ४२ लाख रुपयांचा प्रस्तावही मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.  मात्र, बैठकीत काँग्रेससह अन्य पक्षाच्या समितीमधील सदस्यांनी कुठलाही विरोध केला नाही. याशिवाय मालमत्ता लिलावाची थकबाकी वसुली, शहरातील विविध भागातील उद्यानात संवेदना पार्कची निर्मिती, थंड पाण्याच्या मशीन याशिवाय मलवाहिनी, सिमेंट रस्ते, डांबरी रस्ते असे एकूण ३२ कोटींच्यावर विविध प्रस्ताव असताना या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीमध्ये भाजपाचे दहा सदस्य आहेत, त्यामुळे बहुमताने अनेक विषय मंजूर केले जातात. या बैठकीतही तसेच घडले.

काही विषयांना प्रशासकीय मंजुरी द्यावी लागत असल्यामुळे त्यावर फारशी चर्चा केली जात नाही. मात्र ज्या विषयात काही हरकती असतात अशा विषयावरील प्रस्ताव विभागाकडे परत पाठवले जातात.

– प्रदीप पोहोणे,अध्यक्ष, स्थायी समिती.