* पाच हजार लोकांना थेट रोजगार * मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन
* पतंजली फूड व हर्बल पार्कचे भूमिपूजन

कृषीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग पतंजलीचा फूड व हर्बल पार्क येत्या सहा महिन्यांत सुरू होईल. मिहानमधील या कारखान्यामुळे पाच हजार लोकांना थेट रोजगार मिळणार असून शेतकऱ्यांना लाभ होईल, विदर्भच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला या अन्नप्रक्रिया उद्योगाचा फायदा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मिहानमध्ये शनिवारी पतंजली फूड व हर्बल पार्कचे भूमिपूजन झाले, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदेवबाबा होते. प्रमुख पाहुणे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते. भूमिपूजनासाठी गर्दी गोळा करण्यासाठी पतंजली किसान सेवा संघटना आणि भारत स्वाभिमान संघटनेच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. नागपूर विभागातील वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे २५ हजार लोकांना आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मुख्य कार्यक्रमापूर्वी रामदेबाबा यांनी कपालभाती, अनुलोम, विलोम, शीर्षांसन सादर केले.

या पार्कमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुले व पत्नीला प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे. या अन्न प्रक्रिया उद्योगातून पाच हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे, असे सांगून विदर्भ-मराठवाडय़ात उद्योगांना वाव मिळावा यासाठी राज्य सरकारने ४ रुपये ४० पैसे या दराने वीज देण्याचे ठरवले आहे. यासाठी वीज वितरण कंपनीला ७५० कोटी रुपये सरकार देणार आहे, असेही ते म्हणाले. जगातील ७०० कोटी लोकसंख्येला अन्न पुरवायचे आहे. त्यामुळे जगात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. पतंजली समूहाने विशेष आर्थिक क्षेत्रात जागा घेऊन उत्पादन करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे नागपुरातून देशातच नव्हे तर जगभर उत्पादने जातील आणि हे जगातील सर्वात मोठे फूड पार्क ठरेल, असेही ते म्हणाले.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी फूड व हर्बल पार्कच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे. विदर्भात ७५ टक्के वनक्षेत्र आहे. वनऔषधी मोठय़ा प्रमाणात आहे. अमरावती, गडचिरोली जिल्ह्य़ात कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी जागेची मागणी मोठी आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. भद्रावतीत कोळशापासून युरिया बनविण्याचा कारखाना लवकरच उभारण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना ५० टक्के किंमतीत युरिया उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण यांनी प्रस्ताविक केले. यावेळी महापौर प्रवीण दटके, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने यांच्यासह जिल्ह्य़ातील आमदार उपस्थित होते.

मोदी काश्मीर प्रश्न सोडवतील

काश्मीर अशांत आहे. पंतप्रधान मोदी काश्मीर प्रश्न मार्ग लावतील, असे रामदेवबाबा म्हणाले. नागपुरात फूड पार्कमध्ये दररोज ५ हजार टन मालावर प्रक्रिया केली जाणार आहे. हरिद्वारपेक्षा चारपट मोठे हे युनिट राहणार आहे. नागपूरच्या संत्राच्या रस संपूर्ण देशात जाईल. सध्या मिळत असलेला रस हा माल्टाचा आहे. तो संत्र्याच्या नावाने खपवला जात आहे, असे रामदेवबाबा म्हणाले.

परदेशातही उत्पादने पाठवणार

परदेशात उत्पादने निर्यात करण्यासाठी रामदेवबाबा विशेष आर्थिक क्षेत्रात ६० एकर जमीन घेणार आहे. त्यासाठी दहा कोटी रुपयांचा धनादेश एमएडीसीला सुपूर्द केला. यामध्ये रामदेवबाबांना कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात आली नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.