जवाहरलाल नेहरू रुग्णालयातील घटना

नागपूर : नागपूर जिल्ह्य़ातील कांद्री स्थित वेकोलिच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयात मंगळवारी सकाळी ऑक्सिजनअभावी चार करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामुळे संतप्त नातेवाईकांनी येथे तोडफोड केली.  दरम्यान, प्रशासनाने मात्र ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप फेटाळला आहे.

कन्हान तालुक्यातील कांद्री येथील वेकोलिच्या जवाहरलाल नेहरू केंद्रीय रुग्णालयात नुकतेच कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. सोमवारी रुग्णालयात २९  रुग्णांवर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी ऑक्सिजन संपले. ऑक्सिजन अभावी चार रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी येथे तोडफोड केली.  कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर दिल्यावर त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

रुग्णालयात केलेल्या प्राथमिक निरीक्षणात येथे आवश्यक ऑक्सिजन उपलब्ध होते. परंतु, दाखल रुग्णांमधील ऑक्सिजनचे प्रमाणही खूप कमी असल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पुढे आले. त्यानंतरही घटनेचे गांभीर्य बघत येथील डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांचे लेखी बयाण घेतले जात आहेत.  काही अनुचित आढळल्यास कारवाई केली जाईल. 

– योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर.