सेवासदन चौक, टिपू सुलतान चौकातही रुग्ण; ४३२ पैकी ३५७ रुग्ण करोनामुक्त

नागपूर : एका खासगी रुग्णालयात कार्यरत डॉक्टरसह एकूण चौघांना करोना विषाणूची बाधा झाल्याचे मंगळवारी  स्पष्ट झाले. यापैकी दोघे सेवासदन चौक, टिपू सुलतान चौक या नवीन भागातील असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या ४३२ वर पोहचली असून यापैकी ३५७ जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

स्वस्तिक रुग्णालयात कार्यरत ४० वर्षीय डॉक्टर हा सेवासदन चौक परिसरात राहतो.  सण असल्याने तो रजेवर होता. दरम्यान त्याला सर्दी, खोकला, तापासह करोनाची लक्षणे असल्याने  त्याने खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली. त्याला करोना झाल्याचे कळताच मेयो रुग्णालयात दाखल करून  त्याच्या  संपर्कातील व्यक्तींना विलगीकरणात घेण्याची प्रक्रिया सुरू केली गेली. सोबत मोमीनपुरातील एक आणि टिपू सुलतान चौक येथील एक अशा दोघांनाही या विषाणूची बाधा असल्याचे पुढे आले.

एकाच दिवशी दोन नवीन परिसरातील रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. मोमीनपुरातील बाधित पाचपावलीतील विलगीकरण केंद्रात होता. या चार नवीन रुग्णांमुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाबाधितांची संख्या थेट ४३२ वर पोहचली आहे. यापैकी ३५७ व्यक्ती करोनामुक्त झाले आहेत. ८ जणांचा या आजाराने बळी गेला आहे. आज मंगळवारी  मेयो रुग्णालयातून  संतोषीनगरातील एक व नारा येथील एकाला करोनामुक्त झाल्याने सुट्टी दिली गेली.

१४ दिवसांचे गृहविलगीकरण

सर्व विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १४ दिवसांच्या गृहविलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरही महापालिकेच्या आरोग्य पथकामार्फत प्रत्येक विमान प्रवाशाची ‘थर्मल स्क्रीनिंग’ केली जात आहे.

मेडिकल, मेयो, एम्समध्ये ६७ बाधित

६७ करोनाबाधितांवर मेडिकल, मेयो आणि एम्समध्ये उपचार सुरू आहेत. सध्या एम्समध्ये प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर तीन बाधितांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यावर औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रा. प्रशांत जोशी विशेष लक्ष ठेवून आहेत. येथील रुग्णांना अद्ययावत सेवा देण्यासाठी संचालिका डॉ. विभा दत्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, प्रयोगशाळा प्रमुख डॉ. मीना मिश्रा प्रयत्न करत आहेत.

१,६८१ जण विलगीकरण केंद्रात

नागपूर महापालिका प्रशासनाने बाधितांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या १,६८१ व्यक्तींना आमदार निवाससह  इतर विलगीकरण केंद्रात  ठेवले आहे. सोमवारी रात्रीपासून मंगळवापर्यंत ९० जणांना येथे आणले गेले.

प्रतिबंधित परिसर मोकळे केले 

करोना बाधित आढळल्यानंतर प्रतिबंधीत करण्यात आलेल्या भागात एकही रुग्ण नसल्यामुळे काही भाग मंगळवारी मोकळे करण्यात आले. यामध्ये  लालगंज दलालपुरा, गौतम नगर,  राजीव गांधी नगर, कुंदनलाल गुप्ता नगर,  भालदारपुरा व सतरंजीपुरा झोनमधील   शांतीनगरचा समावेश आहे.