नागपूर : असामाजिक तत्त्वांना  रोखण्यासाठी  नागपूर मध्यवर्ती स्थानकावरील  चारपैती तीन प्रमुख प्रवेशव्दार बंद केल्याने गर्दीच्या वेली ऐकमेव प्रवेशव्दारावर प्रवाशांची रेटारेटी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भौगोलिकदृष्टय़ा देशाच्या मध्यभागी असल्याने नागपूर येथून देशाच्या चारही दिशांना गाडय़ांचे अवागमन होते.  दररोज सुमारे ३० हजार प्रवाशांची येथे ये-जा होते. प्रवाशांची संख्या बघता एकाच प्रवेशद्वारातून आत जाणे आणि बाहेर पडणे अडचणीचे ठरते. विशेषत: सायंकाळच्या वेळेस अधिक गाडय़ा असल्याने प्रवाशांची गर्दी होते. फलाट क्रमांक १ वर गाडीची प्रतीक्षा करणारे प्रवासी आणि एक ते ८ फलाटावरून बाहेर पडणारे प्रवासी यांची गर्दी फलाट १ वर होते. त्यामुळे दाटीवाटीतून मार्ग काढत प्रवेशद्वारापर्यंत प्रवाशांना पोहचावे लागते आहे.

मुख्य प्रवेशद्वारावर स्थानकाच्या आत आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आहे. आत जाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ बॅगेज स्कॅनर आहे, परंतु प्रवेशद्वाराची रुंदी कमी आहे. स्कॅनरमुळे प्रवेशद्वार आणखी  अरुंद होते. प्रवाशांची संख्या आणि सर्व प्रवेशद्वार बंद असल्याने हे मुख्य प्रवेशद्वार अपुरे पडते. लोहमार्ग पोलीस ठाण्याजवळील प्रवेशद्वार

बंद करण्यात आले. त्याआधी व्हीआयपी प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्याजवळील प्रवेशद्वार बंद करण्यात आले. यामुळे सर्व प्रवाशांचा भार मुख्य प्रवेशद्वारावर पडला आहे.

सामान तपासणीसाठी बॅग स्कॅनरची आवश्यकता असल्याने प्रवेश मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देणे समजण्यासारखे आहे, परंतु फलाटावरील गर्दी कमी करण्यासाठी बाहेरून नागपुरात आलेल्या प्रवाशांना तातडीने स्थानकाबाहेर पडता यावे म्हणून लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या बाजूचे प्रवेशद्वार सुरू करण्यात काहीच हरकत नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी पाहणी करून बाहेर पडण्यासाठी आणखी एक मार्ग सुरू करावा, अशी मागणी भारतीय यात्री केंद्राचे सचिव व मध्य रेल्वेच्या झेडआरयूएसीसीचे सदस्य बसंतकुमार शुक्ला यांनी केली.

स्थानकाच्या पश्चिम दिशेला मुख्य प्रवेशद्वार आणि फिरते जिने आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. सध्यातरी या व्यतिरिक्त कोणतेही प्रवेशद्वरा सुरू केले जाण्याची शक्यता नाही.

– एस.जी.राव,सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे.