सर्वाधिक तीन मृत्यू यवतमाळात; दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर

नागपूर : राज्याच्या विविध  भागासह विदर्भातही आता स्वाईन फ्लूचा विळखा घट्ट होत आहे. नागपूरच्या विविध रुग्णालयांत नवरात्रीच्या कालावधीत या आजाराचे चार बळी गेले असून सर्वाधिक तीन मृत्यू यवतमाळ जिल्ह्य़ातील असल्याची नोंद  महापालिकेने केली आहे.  उपराजधानीतही या आजाराने एक रुग्ण दगावला असून शहरातील रुग्णालयांत दोन जण आजही व्हेंटिलेटरवर असल्याचे पुढे आले आहे.

मंगला सहारे (५१) रा. बेलतरोडी, नागपूर, ज्योती तावडे (३३) रा. यवतमाळ, गणेशलाल जयस्वाल (६४) रा. यवतमाळ, सीताराम डोंगरे (७२) रा. यवतमाळ असे ‘स्वाईन फ्लू’ने दगावलेल्या रुग्णांचे नाव आहे. या रुग्णांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावर प्रथम त्यांच्या जवळच्या रुग्णालयांत उपचार करण्यात आले.  प्रकृती खालवल्यावर त्यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नवरात्रीच्या काळात चार मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग चिंतित आहे.  याचकाळात एकूण १२ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. पैकी दोन अत्यवस्थ रुग्ण व्हेंटिलेटवर असून त्यांच्यावर उपराजधानीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार कधी?

काही वर्षांपूर्वी उपराजधानीत स्वाईन फ्लूमुळे अनेकांचे बळी गेले होते.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या समितीने नागपूर महापालिकेच्या काही रुग्णालयांची पाहणी केली होती. एकाही रुग्णालयांत या रुग्णांना दाखल करण्याची सोय नसल्याचे बघत समितीने आश्चर्य व्यक्त केले होते  व  आवश्यक यंत्रणा उभारण्याची सूचना केली गेली होती, परंतु अद्यापही महापालिकेला एकाही रुग्णालयात ही सोय करता आली नाही. सध्या हे रुग्ण आढळल्यास त्यांना मेडिकल, मेयोसह खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यापलीकडे महापालिकेचा आरोग्य विभाग काहीच करत नाही. दरम्यान, महापालिकेकडून जनजागृती अभियान राबवले जात असल्याचे सांगण्यात आले.