मंगेश राऊत

अनेकांचा शस्त्रांसह परिसरात शिरण्याचा प्रयत्न; वकिलावरील हल्ल्यानंतर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

जिल्हा न्यायालयाच्या परिसरात आज शुक्रवारी एका वकिलाने दुसऱ्या वकिलावर कुऱ्हाडीने वार करून जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर न्यायालय परिसरातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या महिनाभरात उच्च न्यायालय परिसरातही चौघांना पिस्तुलांसह ताब्यात घेण्यात आले होते. त्याशिवाय गुप्ती घेऊन एक गुंडही उच्च न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न करीत असताना पकडण्यात आला होता.

गेल्या काही वर्षांपासून वकिलांवरील हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हा न्यायालय परिसरातील दगडी इमारतीमध्ये कुख्यात अक्कू यादवचा जमावाकडून खून करण्यात आला होता. त्यानंतर पिंटू शिर्के याचाही सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये खून झाला. जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात काही पक्षकारांनी वकिलांना

मारहाण केल्याच्या घटना ताज्या आहेत. आजच्या घटनेने पुन्हा एकदा न्यायालय व परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २०११ मध्ये दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालय परिसरात वरिष्ठ अधिवक्ता प्रशांत भूषण यांच्यावर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कक्षात शिरून मारहाण केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली. तरीही काही लोक शस्त्र घेऊन उच्च न्यायालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या महिनाभरात उच्च न्यायालयाच्या सुरक्षेतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चौघांकडून चार पिस्तूल जप्त केले. त्यापैकी दोन पिस्तूल या अत्याधुनिक तर दोन पिस्तूल देशी बनावटीचे होते. शस्त्र न्यायालयाच्या परिसरात शस्त्र घेऊन जाणाऱ्यांमध्ये अमरावती येथील एक बिल्डर, गडचिरोली पोलीस दलातील एक शिपाई व उपराजधानीतील दोन तरुणांचा समावेश आहे. एक कुख्यात गुंड  सुनावणीसाठी येत असताना बॅगमध्ये गुप्ती घेऊन शिरला होता. पण, सुरक्षा रक्षकांनी त्याची बॅग तपासली व त्याला ताब्यात घेतले. या सर्वाना उच्च न्यायालयाच्या सुरक्षारक्षकांनी सदर पोलिसांच्या हवाली केले होते.

साध्या गणवेशातील पोलीसही तैनात

सामान्य नागरिकांना उच्च न्यायालयात प्रवेश देण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे. इतर प्रवेशद्वारांचा वापर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, कर्मचारी व वकील यांच्याकडून होतो. एक प्रवेशद्वार वकिलांची वाहने बाहेर निघण्यासाठी आहे. प्रत्येक प्रवेशद्वारावर कडेकोट सुरक्षाव्यवस्था आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची पूर्णपणे तपासणी करून व नावनोंदणी करूनच आतमध्ये सोडण्यात येते. न्यायालय परिसरात पोलीस अधिकारी असो किंवा सामान्य नागरिक कुणालाही सोबत शस्त्र बाळगता येत नाही. त्यामुळे शस्त्र घेऊन कुणी दिसल्यास ताबडतोब त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सदर पोलिसांच्या स्वाधीन केले जाते. लोकांची संशयास्पद हालचाल टिपण्यासाठी साध्या वेशातील पोलीस कर्मचारीही परिसरात फिरत असतात. कडक सुरक्षाव्यवस्थेमुळेच कुणीही आतमध्ये शस्त्रांसह प्रवेश करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया उच्च न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालय परिसरात अकोला येथील बहीण-भावाच्या बॅगमध्ये कोयत्यासारखे शस्त्र सुरक्षा रक्षकांना दिसले होते. त्यांना चौकशीकरिता सदर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गडचिरोली पोलीस दलातील एका शिपायाच्या कमरेला बंदूक होती. त्याला शस्त्रासह प्रवेश नाकारून सदर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व गडचिरोली अधीक्षकांकडून पडताळणी करूनच त्याला सोडण्यात आले. इतर प्रकरणांमध्येही संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात आली.

– सुनील बोंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सदर