‘एफडीए’कडून ट्रान्सपोर्ट गोदाम सिल

अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) वाडीतील ट्रान्सपोर्टच्या एका गोदामावर छापा टाकून तेथील सुगंधित तंबाखूचा सुमारे दीड लाखाचा साठा जप्त केला. ही पेढीच सिल करण्यात आल्याने वाडीतील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

सुभाष मोहनलाल बिश्नोई आणि कैलाशचंद कानाराम बिश्नोई असे या ट्रान्सपोर्ट गॅरेजच्या मालकाचे नाव आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांना वाडीतील मे. एस.सी. लॉजिस्टिक, गोपला कॉम्प्लेक्स, खदान रोड, वाडी येथे मोठय़ा प्रमाणावर प्रतिबंधात्मक सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून अधिकाऱ्यांनी सिनेस्टाईल येथे छापा टाकण्याचे नियोजन केले. त्यासाठी एक-एक करत सामान्य वेशात येथे अधिकाऱ्यांना पाठवले गेले. त्यानंतर एकत्र सगळ्यांनी छापा टाकला. हा प्रकार ट्रान्सपोर्ट कर्मचाऱ्यांसह मालकांना कळताच तेथे गोंधळ उडाला.

तब्बल दीड लाखाचा २४८ किलो सुगंधित तंबाखूचा निळ्या रंगाच्या प्लास्टिकमध्ये साठा बघून सगळे थक्क झाले.

हा सगळा साठा जप्त करत त्यातील नमुने तपासणीसाठी एफडीएने प्रयोगशाळेत पाठवले. त्यानंतर या पेढीला सिल करण्यात आले. ही कारवाई सहाय्यक आयुक्त शरद कोलते यांच्या नेतृत्वात ललित सोयाम, महेश चहांदे यांनी केली.