|| मंगेश राऊत

अटकेनंतर काही तासात न्यायालयात सादर करून कारागृहात पाठवले 

बनावट दस्तावेजाच्या आधारावर भूखंड विकून अनेकांची फसवणूक करण्याच्या प्रकरणात अजनी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून काही तासांतच न्यायालयात सादर केले. विशेष म्हणजे, आरोपींची पोलीस कोठडी न मागता त्यांची रवानगी थेट कारागृहात करण्यात आली. जेणेकरून दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन मिळावा. न्यायालयालाही पोलिसांच्या भूमिकेवर संशय आल्याने आरोपींना जामीन नाकारला व पोलिसांचा डाव फसला. या सर्व खटाटोपासाठी पोलिसांनी ३० लाख रुपये घेतल्याची चर्चा पोलीस वर्तुळात असून याची तक्रारही पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

मौजा वडद परिसरातील प्लॉट क्रमांक २८ मधील १ हजार १२० चौरस फुटाचा भूखंड एनएसजी बिल्डर्स अ‍ॅण्ड लॅण्ड डेव्हलपर्सने एका नागरिकाला विकला होता. पण, अनेक वष्रे त्याचे विक्रीपत्र करून दिले नाही. जवळपास २०११ ते २०१६ या दरम्यान कंपनीने अनेकांना भूखंड विकले. याप्रकरणी अजनी पोलिसांत तक्रार देण्यात आली. अजनी पोलिसांनी तपास करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी संजय दिनेश गुप्ता ऊर्फ आर्यन दिनेश अग्रवाल रा. पिरॅडि सिटी, पिपळा बेसा रोड , सुशांत वसंतराव शेंडे रा. भगवाननगर, राहुल यशवंत खडोदे रा. नंदनवन झोपडपट्टी आणि मोहित वाघे यांना आरोपी करण्यात आले.

याप्रकरणी  पोलिसांनी संजय गुप्ता ऊर्फ अग्रवाल याला ९ ऑगस्ट २०१९ ला अटक केली. त्याच दिवशी संजयचा साथीदार सुशांत शेंडे याला व इतरांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. दोन आरोपींच्या पत्नींनाही बोलावण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय चप्पे व कैलाश मगर यांनी रात्री १.३० वाजता आरोपींना सोडले. दुसऱ्या दिवशी सुशांत शेंडे सकाळी पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी काही तासांत दस्तावेज तयार करून सुशांत शेंडे याला दुपारी २.३० वाजता न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले व न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची विनंती केली. त्यावेळी संजय गुप्ता हा पोलीस कोठडीत होता.

दुसरीकडे शेंडेच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला. याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांना शंका उपस्थित झाली व त्यांनी इतक्या गंभीर गुन्ह्य़ात आरोपीची पोलीस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडीत का पाठवले, याचे स्पष्टीकरण सादर करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना बोलावले होते. पण, अद्यापही ते हजर झाले नाही. शेवटी न्यायदंडाधिकाऱ्यांनी शेंडेला जामीन देण्यास नकार दिला.

गुन्हा कमकुवत करण्यासाठी ३० लाख घेतल्याचा आरोप

आदिवासी व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून त्याची विक्री करण्यासाठी राहुल खडोदे व मोहित वाघे यांनी रबर स्टँप व इतर साहित्य तयार केले. ही माहिती स्वत: संजय गुप्ताने आपल्या जबाबात दिली. पण अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही. याप्रकरणी आरोपींना जामीन मिळण्यासाठी मदत करणे व खटला कमकुवत करण्यासाठी पोलिसांनी आरोपींकडून ३० लाख रुपये घेतल्याची तक्रार पोलीस आयुक्तांना करण्यात आली. पैशासाठी काही कर्मचाऱ्यांनाही वगळण्यात आल्याने पोलीस ठाण्यात धुसफूस सुरू आहे.

चौकशीनंतरच कारवाई करू हा अतिशय गंभीर प्रकार आहे. असे प्रकार खपवून घेणार नाही. प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई जाईल. – डॉ. भूषण कुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त.