नागपूर : राष्ट्रवादीच्या नेत्याने बनावट दस्तऐवजाद्वारे पत्नीच्या नावे भूखंड नोंदणी करून एका व्यापाऱ्याची फसवणूक केली. याप्रकरणी धनराज रामाजी फुसे (५५) आणि सुनीता धनराज फुसे (४५) रा. साकेतनगरी यांच्याविरोधात बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धनराज हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश सचिव आहे.

गगन मुकूटबिहारी चौरसिया (५२) रा. भाजी मंडी चौक, सीताबर्डी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. फुसे हा प्रिया को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा सचिव आहे. ऑगस्ट २००० मध्ये फुसे यांनी बेलतरोडीतील खसरा क्रमांक ६४,०१ मध्ये लेआऊट तयार केले. यातील एक प्लॉट चौरसिया यांनी ३५ हजार रुपयांमध्ये खरेदी केला. काही महिन्यांपूर्वी ते प्लॉटचा कर भरण्यासाठी गेले असता हा प्लॉट धनराज यांच्या पत्नी सुनीता यांच्या नावे असल्याचे कळले. फुसे यांनी चौरसिया यांचे छायाचित्र लावून बनावट स्वाक्षरी करून प्लॉट सुनीता यांच्या नावे केल्याचे समोर आले. चौरसिया यांनी बेलतरोडी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी फुसे व त्यांच्या पत्नी सुनीता या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यापूर्वी अनिता अशोक रेड्डीवार (६५) यांचीही सहा लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी फुसेंविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.