अजित पवार यांची माहिती

नागपूर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहे. एवढेच नव्हे तर समविचारी पक्षांना आघाडीत समावेश राहणार आहे. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी जागा वाटपाबाबत २ नोव्हेंबरला बैठक होत आहे. जागेच्या वादाचा मुद्दा उद्भवल्यास दोन्ही पक्षाचे श्रेष्ठी त्यावर अंतिम निर्णय घेतील, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

काटोल येथील कार्यक्रमाला आले असता ते प्रेस क्लबमध्ये बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार निश्चित झाले आहे. त्यासोबतच सर्वनिरपेक्ष पक्षांना देखील सोबत घेतले जाणार आहे. त्यासंदर्भात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, खासदार राजू शेट्टी,  प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई यांच्याशी चर्चा सुरू आहे. समविचारी पक्षांनी मतांचे विभाजन टाळण्यासाठी  एकत्र लढणे गरजेचे आहे. आघाडीतील पक्षांनी जागा वाटपाबाबत बोलणी करताना आपापली शक्ती बघून जागेची मागणी करावी, एवढेच अपेक्षा आहे. गेल्या चार वर्षांत चित्र बदलेले आहे. त्यामुळे जागा कमी-अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे जलपूजन दोन वर्षांपूवी केले होते. जलपूजन झाल्यानंतर लागलीच काम सुरू व्हायला हवे होते, परंतु तसे झाले नाही. त्यानंतर कुणाच्यातरी हट्टापायी पुन्हा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक लोक एकेका बोटमध्ये बसवण्यात आले. त्यामुळे हकनाक एकाचा बळी गेला. आता स्मारकाबाबत लोकांच्या मनात शंका येत असून लोक वेगवेगळे पर्याय सुचवू लागले आहे. वेळीच स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली असती तर अशी स्थिती उद्भवली नसती, परंतु भाजप आणि शिवसेना स्मारकाच्या मुद्यांवरू लोकांच्या भावनाचा खेळ करू पाहते आहे, असा आरोपही त्यांना केला.

काटोलमध्ये दोन्ही देशमुख एका व्यासपीठावर

आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आशीष देशमुख हे आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसून आले. काटोलचे आमदार असताना माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आशीष देशमुख यांच्यावर टीका करीत होते. काटोलमध्ये अनिल देशमुख यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना निमंत्रित करण्यात आले होते. व्यासपीठावर आशीष देशमुख होते. यासंदर्भात अजित पवार म्हणाले, मुकुल वासनिक हे आशीष देशमुख यांना घेऊन आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी निवडणूक एकत्र लढणार आहोत. अशाप्रकारे एकत्र मेळावे अधिक परिणामकारक ठरणार आहे. यामुळे आगामी काळात या दोन्ही पक्षाचे एकत्रित मेळावे घेण्यात येतील, असेही पवार म्हणाले.

ईव्हीएमवर विश्वास

बहुतांश सर्व विरोधी पक्षांनी मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) शंका व्यक्त केली असताना अजित पवार यांनी ईव्हीएम विश्वास व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाने आवाहन केले असता कोणीही तिकडे गेले नाही. इव्हीएम फेरफार करणे शक्य असल्यास पंजाब, कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाला नसता. तसेच गुजरातमध्ये सुरतमधील ११ जागांचा निकाल वेगळा लागला असता भाजपाचे सरकार बनले नसते, असेही अजित पवार म्हणाले.