21 October 2018

News Flash

छुप्या इंधन दरवाढीतून ग्राहकांच्या खिशावर डल्ला

दरवाढीची चर्चा होत नसली तरी ग्राहकांच्या खिशावर मात्र ताण वाढला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

ग्राहकांना दिलासा नाही

काँग्रेसच्या कार्यकाळात इंधन दरवाढी विरोधात देशभरात आंदोलन करणाऱ्या भाजपने केंद्रात सत्ता आल्यावर पारदर्शकतेच्या नावाखाली दर निर्धारणासाठी लागू केलेल्या नवीन पद्धतीच्या माध्यमातून छुपी दरवाढ सुरू केली आहे. दररोज केवळ तीन पसे, पाच पैसे वाढ होत असून एक महिन्यात पेट्रोल दीड रुपयाने तर डिझेल ३ रुपयांनी महागले आहे. त्यामुळे दरवाढीची चर्चा होत नसली तरी ग्राहकांच्या खिशावर मात्र ताण वाढला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने होणाऱ्या चढउतारामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वारंवार खाली-वर होतात. मात्र, अनेकदा बॅरलच्या भावात वाढ झाली की त्याचा थेट फटका ग्राहकांना सहन करावा लागतो. असे होऊ नये म्हणून भारतातील प्रमुख तेल कंपन्यांनी आणि सरकारने इंधनाचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला भाजप सरकारने हिरवा कंदील देत १ जुल २०१७ पासून त्यावर अंमलबजावणी सुरू केली. या पद्धतीमुळे दर नियंत्रणात राहतील आणि ग्राहक व पेट्रोलपंप मालकांनाही दिलासा मिळेल, असा विश्वास कंपन्यांनी आणि सरकारने व्यक्त केला होता. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत केवळ एकच वेळा दर कमी झाले. सप्टेंबर २०१७ च्या दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारने दोन-दोन रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केला होता. त्यावेळी इंधनाचे भाव अगदी अल्प प्रमाणात कमी झाले होते. मात्र, त्यानंतर दरकपात झालीच नाही. काँग्रेसच्या काळात चार ते सहा महिन्यातून किंवा वर्षांतून एकदा दरवाढ होत होती. तेव्हा भाजपकडून आंदोलन केले जात असे, परंतु आज दररोज दरबदलच्या निमित्ताने इंधन दरात सातत्याने वाढ सुरू आहे. मागील महिन्याचा विचार केला तर पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहे. १ डिसेंबर २०१७ ला पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७७ रुपये आणि ०५ पसे होते. त्यामध्ये दरदिवशी सातत्याने सात, दहा, मग बारा पशांनी वाढ होत गेली अन् आज ७८.९४ रुपयांवर जाऊन पोहोचली. डिझेलही जवळपास तीन रुपयांनी वाढले आहे.

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल (१५९ लिटर) चार हजार ६५ रुपये आहे. प्रती लिटर दर २५ रुपये ५६ पैसे इतके होतात. डिझेल देखील सारख्यास दरात मिळते. मात्र, त्यावर प्रक्रिया, वाहतूक खर्च आणि विविध कर लावून इंधन महाग झाले आहे. अशात विविध राज्यातील जीएसटीमुळे त्यात अधिक भर पडली आहे.

सर्वसामान्यांचा पसा हा इंधनावर मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. त्यामुळे सरकारने हा विषय गांभीर्याने हाताळणे गरजेचे आहे. दररोजच्या दरवाढीमुळे महागाई देखील वाढली आहे. सामान्य जनतेची ही एकप्रकारची लूट आहे. असेच सुरू राहिले तर पेट्रोल शंभर रुपये प्रतिलिटर होईल.

मुकेश खडतकर, ग्राहक

पूर्वी तेल कंपन्या तोटय़ात होत्या. त्यांना फायद्यात आणण्यासाठी सरकारने ही उपाययोजना केली आहे. इंधन दरवाढ होत असली तरी त्याचा फटका आम्ही देखील सहन करतो आहे.

प्रणय पराते, पेट्रोलपंप चालक

First Published on January 12, 2018 2:01 am

Web Title: fuel costs increase issue petrol diesel price rise