ऐनवेळी प्रवासाला निघणाऱ्यांसमोर मोठी अडचण

नागपूर : करोना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्या विमान प्रवाशांनाही राज्यांतर्गत प्रवासासाठी करोना चाचणी सक्तीची असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे एस.टी. आणि रेल्वे प्रवासासाठी (राज्यांतर्गत) ही स क्ती नाही हे येथे उलेखनीय.

राज्यात करोनाची साथ कमी झाल्यावर टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करणे सुरू झाले.  या काळात अनेकांनी लसीची किमान पहिली मात्रा घेतली. काही जणांनी दोन मात्रा घेतल्या. लस घेतल्यावर करोना संसर्गाचा धोका कमी होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. असे असतानाही अजूनही राज्यांतर्गत विमान प्रवासासाठी प्रवाशांना करोना चाचणी सक्तीची आहे. नागपुरातून दररोज शेकडो प्रवासी मुंबई-पुण्याला विमानाने जातात. त्यांना चाचणी सक्तीचा फटका बसतो आहे.  पूर्वनियोजित कामासाठी जायचे असेल तर चाचणी करून ठेवता येते. पण तातडीने मुंबई किंवा पुण्याला जायचे असेल तर चाचणी अहवालासाठी धावपळ करावी लागते. लस घेतल्यावरही चाचणी सक्ती करणे अयोग्य असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त के ले आहे. विशेष म्हणजे एस.टी. आणि रेल्वेत राज्यांतर्गत प्रवासासाठी करोना चाचणी सक्तीची नाही.  प्रवासी संघटनांनी चाचणी सक्तीला विरोध के ला आहे. करोनाची एक किंवा दोन्ही लस घेणाऱ्या प्रवाशांना यातून सूट मिळावी, अशी मागणी  या संघटनांनी के ली आहे. दरम्यान विमानतळ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यांतर्गत विमान प्रवासासाठी चाचणी गरजेची नाही,पण बाहेरच्या राज्यातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर करोना चाचणी के ली जाते.

 

‘‘रेल्वेने राज्यांतर्गत प्रवास करायचा असेल तर करोना चाचणी अहवालाची गरज नाही.  इतर राज्यातून येणाऱ्यांना मात्र चाचणी करणे आवश्यक आहे.’’

प्रवीण पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

 

करोना निर्बंध शिथिलीकरणाच्या एक ते चार स्तरात असलेल्या जिल्ह्य़ात एस.टी.तून प्रवास करण्यासाठी कुठल्याही चाचणीची गरज नाही. फक्त पाचव्या स्तरात  असलेल्या जिल्ह्य़ात चाचणीची अट आहे.’’

नीलेश बेलसरे, विभागीय नियंत्रक, एस.टी.महामंडळ नागपूर.

‘‘करोनाची भीती संपलेली नाही. त्यामुळे या संदर्भातील नियमांचे पालन प्रवाशांनी करणे गरजेचे आहे. मात्र करोनाचे नियम प्रवाशांसाठी अडचणीचे ठरू नयेत. पहिली लस किंवा दोन्ही लस घेतली असेल व त्याचे प्रमाणपत्र प्रवाशांकडे असेल आणि प्रकृतीही उत्तम असेल तर अशा प्रवाशांना केवळ त्यांनी करोना चाचणी केली नाही म्हणून प्रवास करण्यास मनाई करणे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे.’’

वसंत शुक्ला, भारतीय प्रवासी संघ. नागपूर.