चाकात अडकल्याने २० फुटांपर्यंत फरफट; रस्ताभर विखुरले शरीराचे अवयव

भंडाऱ्याकडून वाळू भरून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने पारडी परिसरात दुचाकीस्वार दोन सख्ख्या बहिणींना चिरडले. हा अपघात इतका भयावह होता की दोन्ही मुली टिप्परच्या मागच्या चाकात अडकून सुमारे २० फूट फरफटत गेल्या. या अपघातानंतर नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यावरील गर्दी पांगवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी राखीव पोलिसांना पाचारण करावे लागले.

लक्ष्मी रमाशंकर शाहू (२१) आणि आंचल रमाशंकर शाहू (१९) रा. जयदुर्गा शंकर किराणा दुकान, बिडगाव रोड असे मृत बहिणींचे नाव आहे. त्यांच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. मृत मुलींचे शिक्षण बी.ए. प्रथम वर्ष व द्वितीय वर्षांपर्यंत झाले होते. त्या वडिलांना दुकान सांभाळण्यात मदत करायच्या. बुधवारी सकाळच्या सुमारास वडील किराणा दुकानात सामान भरण्याच्या उद्देशाने बाहेर गेले होते. दुकानात दररोज १० लिटर दूध विकले जाते. परंतु ते आणायला कुणीच नव्हते. त्यामुळे दोघीही बहिणी सकाळी ७ वाजताच्या सुमारास एमएच-४९, एझेड-९३३१ क्रमांकाच्या दुचाकीने पारडी मार्गावर हनुमान मंदिर परिसरात गेल्या होत्या. दूध खरेदी करून रस्त्यावरून यू-टर्न घेऊन घरी परतत असताना भंडाऱ्याकडून येणाऱ्या एमएच-४०, एके-१००८ या वाळूने भरलेल्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयावह होता की, दुचाकीसह एक बहीण ट्रकचालकाच्या दिशेला असलेल्या समोरच्या चाकात अडकली तर पाठीमागे बसलेली दुसरी पाठीमागच्या चाकात सापडली. टिप्परची गती प्रचंड असतानाच चालकाने ब्रेक दाबल्याने दोघीही जवळपास २० फूटांपर्यंत फरफटत गेल्या. यामुळे दोन्ही मुलींच्या शरीराचे तुकडे झाले. या अपघातानंतर टिप्परचालक पळून    गेला. माहिती मिळताच कळमना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गर्दी व तणावाची परिस्थिती विचारात घेऊन राखीव पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर हवालदार रामेश्वर बरगट यांनी टिप्पर चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

पारडी मार्गावर तीन वर्षांत २२ मृत्यू

भंडारा महामार्गावर पारडी दरम्यान तीन अपघातप्रवण स्थळे आहेत. या तीन स्थळांवर गेल्या तीन वर्षांत ८४ अपघात झाले असून ६५ जण जखमी झाले. त्यात २२ जणांचा मृत्यू झाला. या तीन अपघातप्रवण स्थळांपैकी जुना पारडी नाका सर्वाधिक धोकादायक असून त्या ठिकाणी ६६ अपघात झाले असून ५० जण जखमी व १८ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रकाश हायस्कूलजवळ ७ अपघातांमध्ये ४ जणांनी आपले प्राण गमावले.  हनुमान मंदिराजवळ आतापर्यंत ११ अपघात झाले. या मार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करायचे असल्यास रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे. त्याशिवाय मार्गावर मेट्रोचे काम सुरू असून गतिरोधक बसवण्याची आवश्यकता आहे.

आतापर्यंत ८६ जणांचा अपघातात मृत्यू

७ मे २०१९ पर्यंत शहरात एकूण ३२७ अपघातांची नोंद झाली आहे. त्यात ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातांमध्ये सर्वाधिक १५ मृत्यू कळमना पोलीस ठाण्यांतर्गत झाले असून त्यानंतर ७ सोनेगाव, ६ हिंगणा, ५ एमआयडीसी, ४ कोराडी व कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाले आहेत.

अवयव गोळा करण्यासाठी फावडय़ाचा उपयोग

या अपघातामध्ये मृतदेहाच्या पूर्णपणे चिंधडय़ा उडाल्या होत्या. पोलिसांनी पंचनामा करताना फावडय़ाने विखुरलेले अवयव गोळा करून पोत्यात भरले. या अपघाताची माहिती कळताच मुलींचे वडीलही घटनास्थळी पोहोचले व हाय मोकलून रडायला लागले.

अंत्यसंस्कारापासून आई वंचित

मुलींची आई भावाकडे उटी येथे आहे. अपघाताची माहिती आईला देण्यात आली. पण, आई उद्या गुरुवारी सकाळी नागपुरात पोहोचणार आहे. दरम्यान, या अपघातात मुलींच्या मृतदेहाची अवस्था वाईट झाल्याने अंत्यसंस्करासाठी आईची प्रतीक्षा शक्य नव्हती. त्यामुळे आज बुधवारी सायंकाळी पारडी घाटावर दोघींवरही अंत्यसंस्कार करण्यात आले.