दिवाळीत दिलेल्या सन्मानाबद्दल आभार मानले

नागपूर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  यंदा गडचिरोलीच्या जंगलात  कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसोबत सपत्नीक  दिवाळी साजरी केली. त्यावेळी एका पोलीस पत्नीने गृहमंत्री व त्यांच्या पत्नीला भेटवस्तू दिली. या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी आरती अनिल देशमुख यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला पत्र लिहिले. या पत्राची चर्चा पोलीस वर्तुळात असून गृहमंत्र्यांच्या कुटुंबीयांकडून पोलीस कर्मचाऱ्यांप्रती आभार

व्यक्त करण्याचा हा दुर्मिळ प्रसंग आहे.

नक्षलवादाने प्रभावित  गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आपल्या प्राणाजी बाजी लावून सेवा बजावतात. त्यामुळे गडचिरोली व पर्यायाने महाराष्ट्र पोलिसांचा उत्साह वाढवण्याच्या उद्देशाने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यंदाची दिवाळी गडचिरोली पोलिसांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता ते गडचिरोलीपासून ३०० किमी लांब असलेल्या पातागुडम येथे  सपत्नीक गेले होते. राज्याच्या पोलीस विभागाचा प्रमुख आपल्या सोबत दिवाळी साजरी करीत असल्याचे बघून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला.  यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी ज्योती श्रीनिवास मारगोनी यांनी गृहमंत्री आणि त्यांची अर्धांगिनी आरती अनिल देशमुख यांना आपल्या घरी निमंत्रित केले. ज्योती यांनी आरती देशमुख यांना साडी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पंचा भेट दिला.

गडचिरोली पोलीस दलातील सेवा अतिशय आव्हानात्मक असून येथील पोलिसांच्या धर्मपत्नींना अतिशय खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहावे लागते. त्यांच्याकडून मिळालेला सन्मान मोठा आहे. त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी सबला महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्ष आरती अनिल देशमुख यांनी ज्योती मारगोनी यांना पत्र लिहिले.