केंद्रात नितीन गडकरी व राज्यात देवेंद्र फडणवीस असल्याने नागपूरच्या विकासाची गाडी वेगाने धावेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागपूरकरांना आहे आणि त्यादृष्टीने उभय नेत्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र नागपूरसाठी खूप काही करतो आहोत हे सांगण्याच्या नादात या दोन्ही नेत्यांकडून एकच घोषणा अनेक वेळा करण्याचा सपाटा लावला आहे.
दीक्षाभूमीसाठी २५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करणे असो, महिला बचत गटासाठी नागपुरातील बडकस चौकात मॉल्स बांधण्याची घोषणा असो किंवा क्रीडा संकुल, कौशल्य विकास केंद्राची स्थापना असो या यापूर्वी एकापेक्षा अनेक वेळा केलेल्या घोषणा गडकरी-फडणवीस यांनी पुन्हा रविवारी नागपुरात विविध कार्यक्रमादरम्यान केल्या. दीक्षाभूमीसाठी २५० कोटींचा आराखडा ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी दसऱ्याला दीक्षाभूमीवरच केली होती, त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या परिसरात झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरणाप्रसंगी केली आणि तीच घोषणा त्यांनी रविवारीही केली. महिला बचत गटासाठी मॉल्स बांधण्याची घोषणाही त्यांनी पूर्वी जि.प.च्या कार्यक्रमात नंतर मानेवाडय़ातील क्रीडा संकुलात झालेल्या महिला बचत गटाच्या कार्यक्रमात केली होती. इतर घोषणांच्या बाबतही हीच परिस्थिती आहे. गडकरी यांनी केलेल्या शेकडो कोटींच्या रस्त्यांच्या घोषणांमधील नावीन्यही संपुष्टात आले आहे. सध्या ज्या तीनशे कोटींच्या सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले त्याची घोषणा दीड वर्षांंपूर्वी गडकरींनी केली होती. ५० हजार लोकांना रोजगार आणि ५० हजार लोकांना घरे, मोठा ताजबागचा विकास, रेल्वे ओव्हर ब्रीज आणि पुलाची निर्मिती, अंबाझरी उद्यानामध्ये होणारे स्वामी विवेकानंदाचे स्मारक आणि सौंदर्यीकरण, चोवीस बाय सात पाणी पुरवठा प्रकल्प, डंपिंग यार्ड, कचऱ्यापासून वीज निर्मिती, इथेनॉलवर चालणारी बस, ग्रीन बस आदी घोषणाही यापूर्वी गडकरींनी अनेक वेळा केल्या आहेत. आता स्थानिक नेत्यांनीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकणे सुरू केले आहे. केंद्र आणि राज्याच्या योजनांचा प्रचार करण्याचे निर्देश दिल्ली आणि मुंबईतून देण्यात आले असले तरी तो इतका होऊ लागला आहे की नागपूरकरांनाही त्याचा कंटाळा येऊ लागला आहे. स्थानिक नेत्यांच्या भाषणातून सुद्धा त्याच त्या जुन्या प्रकल्पाची माहिती जनतेसमोर मांडली जात आहे. त्यामुळे या घोषणा किती दिवस करणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

या संदर्भात महापालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, केंद्रात आणि राज्यात सरकार येऊन आता दोन वर्षे होत असताना गडकरी आणि फडणवीस यांनी केवळ घोषणा केल्या आहेत. आता सिमेंट रस्त्याची कामे सुरू केली. मात्र यापूर्वी एकही जाहीर केलेली योजना सुरू केली नाही. मिहान आणि मेट्रो प्रकल्प काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळात सुरू झाले होते. त्यामुळे त्यात नवीन काय केले आहे. नागनदी स्वच्छ करून त्यातून बोट चालवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असताना आता त्या बोटची वाट पहात आहे. केंद्र आणि राज्य सरकारने प्रकल्पासंदर्भात केवळ घोषणा केल्या. मात्र अंमलबजावणी एकाही प्रकल्पाची केली नाही. दोन वर्षे होत आहे आता यांच्याकडे तीन वर्षे राहिले आहे. त्यामुळे या तीन वर्षांत जाहीर केलेल्या कोणत्या योजनांची अंमलबजावणी केली जाणार याची वाट नागपूरकर जनता पहात आहे, असेही ठाकरे म्हणाले.