बिहार निवडणुकीतील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर विरोधकांसोबतच आता पक्षांतर्गत टीका होण्यास सुरूवात झाल्यानंतर त्यांच्या बचावासाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. बिहारच्या पराभवासाठी मोदी किंवा शहा यांना दोषी धरता येणार नाही. तशी बेजबाबदार वक्तव्य करणाऱयांवर कारवाई करायला हवी, असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

गडकरी म्हणाले, बिहारमधील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे. पक्षातील प्रत्येक नेता पराभवासाठी जबाबदार आहे. त्यामुळे केवळ मोदी आणि शहांना जबाबदार धरणे चूकीचे आहे. तशी बेजबाबदार विधानं करून पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणाऱयांवर कडक कारवाई करण्याची मागणी पक्षाध्यक्षांकडे केली आहे. बिहारमध्ये आमचा पराभव विरोधकांच्या एकजूटीमुळे झाला आहे. तसेच बिहारमध्ये आम्हाला यश मिळालं नाही हे खरं आहे. पण, निवडणुकीत पराभव झाला म्हणून कोणी संपत नाही. यापुढे भाजप अधिक जोमाने प्रयत्न करेल, असेही गडकरी पुढे म्हणाले. बिहारमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटविण्याची चर्चाही गडकरी यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली.

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, शांता कुमार आणि यशवंत सिन्हा यांनी गेल्या वर्षभरात पक्ष मूठभर लोकांच्या हातात गेल्यानेच ही पाळी ओढवल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातच बंडाचे निशाण रोवले आहे. दिल्लीच्या पराभवापासून पक्षाने धडा घेतला नाही, अशा शब्दात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मोदी व शहा यांना सुनावले आहे. तर, बिहारमधील आणखी सात खासदारांनीही निवडणुकीतील पराभवावरून पक्षनेतृत्वावर उघड प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच शांताकुमार व यशवंत सिन्हा यांनी संयुक्त निवेदनात शहा-मोदी जोडीवर अप्रत्यक्षपणे टीका करीत बिहारमधील पराभवाची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असा आग्रह धरला आहे.