ज्येष्ठ गांधीवादी मा.म. गडकरी यांची खंत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

महात्मा गांधी म्हणजे समाजातील शेवटच्या माणसाला दिशा देणारा आणि राजकारणाच्या पलीकडचा विचार आहे. आज  महात्मा गांधी यांचे नाव घेऊन त्यांचा जयजयकार केला जात आहे. मात्र, त्यांचे तत्त्वज्ञान आणि विचार मात्र नव्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी कुठलेच प्रयत्न होत नाहीत, अशी खंत ज्येष्ठ गांधीवादी आणि सेवाग्राम आश्रमचे माजी अध्यक्ष मा.म. गडकरी यांनी व्यक्त केली.

महात्मा गांधी यांच्या १५० जयंतीच्या पार्श्वभूमीवर  गडकरी यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.  गडकरी म्हणाले, महात्मा गांधी मांडलेले तत्त्वज्ञान आणि विचाराला आधुनिक संदर्भाशी जोडणे आवश्यक आहे. हा विचार स्वत: गांधींनीच त्या काळात मांडला होता. त्या दृष्टीने काहीच प्रयत्न होत नाहीत. महात्मा गांधी यांनी समाजाच्या स्वास्थ्यासाठी जी व्यवस्था निर्माण केली, त्याकडे आज गांभीर्याने पाहिले जात नाही. आश्रमाची संकल्पना ही त्यातूनच निर्माण आली आहे. महात्मा गांधी यांनी लोकशिक्षणाचा विषय मांडला. तो केवळ मांडला नाही तर स्वत: आचरणातही आणला. लोकशिक्षणाच्या माध्यमातून समाज शिक्षित करण्याचा प्रयत्न गांधींनी केला. श्रमजिवी हा समाजातील श्रेष्ठ व्यक्ती आहे, असे  त्यांनी सांगितले. केवळ कागदावर लोकशाही जोपासली नाही तर जनमानसात ती रुजवली. समाजामध्ये राहूनच काम करणार आहे. मला लोकांमध्ये राहून परमेश्वर शोधायचे आहे, अशी त्यांची भावना होती. गांधी आयुष्यभर तसेच जगले. गांधी हे उत्तम वडील होते. माता-पिता आणि सेवकाच्या भूमिकेतून त्यांनी प्रत्येकाला प्रेम दिले. त्यामुळे महात्मा गांधी कुठल्याही राजकीय पक्षाचे किंवा एका व्यक्तीचे नाहीत तर ती एक चळवळ आहे, तो एक विचार आहे. सामान्य माणसांचे महात्मा गांधी हे आदर्श आहेत. महात्मा गांधींचे विचार वाचणे सोपे आहे मात्र, ते कृतीत उतरवणे कठीण आहे. महात्मा गांधी हा केवळ व्याख्यानाचा किंवा मागदर्शन करण्याचा विचार नाही, तर तो कृतीचा विषय आहे. ज्यांनी तो विचार कृतीत न आणता केवळ जयजयकार केला आहे, ते लोक जीवनामध्ये काही करू शकले नाहीत, हेच आजचे वास्तव आहे.

गांधी सांगण्यासाठी अभ्यास, अध्ययनाची गरज

गांधी विचार मांडण्यासाठी अभ्यास आणि अध्ययन करण्याची गरज आहे. तरुण मंडळींनी त्यासाठी समोर आले पाहिजे. आज काम करण्यात जोश आहे पण होश नाही. येणाऱ्या पिढींना महात्मा गांधी कोण आहेत, हे सांगितले गेले पाहिजे. आपले अध्ययन कमी आहे. नवीन पिढीपर्यंत गांधी पोहोचला पाहिजे, असे सर्वच सांगत असतात मात्र त्यासाठी किती लोक प्रयत्न करतात, हा खरा प्रश्न आहे, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.

१ कोटी लोक खादी व्यवसायापासून दुरावले

खादीचे कापड हे केवळ वस्त्र नाही तर महात्मा गांधी यांचा तो स्वावलंबनाचा विचार आहे. मात्र, खादी कापड तयार करणारे चरखे आज दिसेनासे झाले आहेत. पूर्वी विणकारांची संख्या मोठय़ा प्रमाणात होती, परंतु सरकारने खादी व्यवसायाला प्रोत्साहन दिले नाही. त्यामुळे १ कोटी लोक या व्यवसायापासून दूर गेले, अशी खंतही गडकरी यांनी व्यक्त केली.