* १ हजार १३२ पैकी केवळ एकाच मंडळाकडून नोंदणी
* प्रसादातून विषबाधा झाल्यास जबाबदार कोण?

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करण्याचा नियम आहे. परंतु शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी या कायद्याला पाठ दाखवल्याचे चित्र आहे. मंगळवार सकाळपर्यंत शहरातील १ हजार १३२ पैकी केवळ एकाच मंडळाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंद केल्याची माहिती आहे. शहरातील एखाद्या मंडळात प्रसादातून विषबाधासह अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहरात गणेश उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा होतो. नागपूर महानगर पालिकेकडे यंदा १ हजार १३२ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची नोंदणी असून बहुतांश ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना झाली आहे. प्रत्येक मंडळांकडून मोठय़ा प्रमाणावर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आरती झाल्यावर दिवसातून दोन वेळा होतो. मंडळाकडून याप्रसंगी भाविकांना मिठाईसह विविध खाद्य पदार्थांचे वाटप केले जाते. प्रसाद शिळा वा त्यात काही समस्या उद्भवल्यास ते प्राशन केल्यावर भाविकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कायद्यानुसार प्रत्येक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांने अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.

राज्याच्या बहुतांश भागात या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागपूरकरांनाही बसण्याचा धोका आहे. मुंबई शहरात सुमारे दोन वर्षांपूर्वी प्रसादाच्या मिठाईतून मोठय़ा प्रमाणावर भाविकांना विषबाधा झाली होती.

त्यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून नोंदणी झाली नसल्याचे पुढे आले होते. तेव्हा राज्यात कुठेही या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मंडळांची नोंदणी करण्याकरिता योग्य कार्यवाहीचे आदेश दिले गेले होते. परंतु अद्यापही या कायद्याची अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातही होताना दिसत नाही.

मंगळवापर्यंत शहरात केवळ गांधीनगर येथील एका मंडळाकडूनच नोंदणी झाल्याचे पुढे आले. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या मंडळांकडून नोंदणीच होत नसल्याने त्यांना प्रसाद वाटपापूर्वी घ्यायची काळजीसह अन्न व औषध

प्रशासन विभागाच्या कायद्याची माहितीच नसल्याचे दिसत आहे. हा गंभीर प्रकार असतांनाही त्याकडे रायकीय पुढाऱ्यांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही, हे विशेष.

नागपूरात यंदा एका सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीपर्यंत १२४ सार्वजनिक गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांकडून नोंदणी झाली. काहींनी विचारणा केली असून तेही लवकरच नोंदणी करतील. भाविकांच्या सुरक्षेकरिता प्रत्येक मंडळांने प्रसादाच्या कच्चा मालाचे खरेदी बिल, प्रसाद बनविणारे वा स्वयंसेवक, प्रसाद वितरण करणाऱ्या स्वयंसेवकाचे नाव व संपूर्ण पत्ता इत्यादींचा अभिलेख भरून ठेवणे गरजेचे आहे. प्रसादातून काही अनुचित प्रकार घडल्यास चूक कुणाची हे पुढे येईल. मंडळाची नोंदणी वाढावी म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने दोन पथके नियुक्त केली आहेत. ती वेगवेगळ्या मंडळाला भेटी देऊन नोंदी वाढवण्याकरिता प्रयत्न करेल.

– मि. श. देशपांडे,  सहायक आयुक्त (अन्न), नागपूर शहर.

मंडळाकरिता आवश्यक

*  प्रसाद उत्पादित होत असलेली जागा स्वच्छ असावी.

*  प्रसादासाठी लागणारा कच्चा माल परवानाधारक वा नोंदणीकृत व्यावसायिकांकडूनच घ्यावा.

*  प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ असावी, सोबत त्याला झाकणे असावी.

*  फळांचा प्रसाद म्हणून वापर करतांना त्याची खरेदी ओळखीच्या परवाना धारकाकडून करावी.

*  प्रसाद बनविण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य असावे.

* प्रसाद करणाऱ्या स्वयंसेवकास अ‍ॅप्रन, ग्लोव्हज, टोपी (हेड गिअर) मंडळाने पुरवावे.

*  प्रत्येक वेळी प्रसाद वाटप करणाऱ्याने हात स्वच्छ धुवावे.

*  प्रसाद उत्पादन करणारा वा वाटप करणाऱ्याला त्वचा वा संसर्गजन्य आजार असू नये.

*  दूध अथवा दुग्धजन्य पदार्थ थंड राहतील, अशा सुरक्षित तापमानावरच साठवून  ठेवावे.

*  खवा, माव्याची वाहतूक व साठवणूक थंड वाहनातूनच करावी.

*  जुना, शिळा अनेक दिवस शीतगृहात साठविलेला मावा प्रसादासाठी वापरू नये.