• आज भावपूर्ण निरोप
  • १९० कृत्रिम तलाव, निर्माल्यासाठी फिरते रथ

१२ दिवस भक्तिरसात न्हाऊन निघाल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. मंगळवारी अनंत चतुर्दशीला विविध भागांतील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार असून यासाठी महापालिकेने पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जय्यत तयारी पूर्ण केली आहे.

मंगळवारी सकाळपासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मिरवणुकीसाठी ढोल-लेझिम पथके, ध्वज पथके, बँड पथक सज्ज आहेत. सोनेगाव आणि सक्करदरा तलावात विसर्जनावर बंदी आहे. तेथे तलावाजवळ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनासाठी सर्वाधिक गर्दी फुटाळा तलाव, गांधीसागर तलावावर असते. ही बाब लक्षात घेऊन तेथे महापालिका प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे.

नाईक तलाव, सोनेगाव तलाव, अंबाझरी ओव्हर फ्लो, खदान तलाव, गोरेवाडा ओव्हर फ्लो, कोराडी तलाव तसेच संजय गांधी नगर या ठिकाणी पाच ते सहा कृत्रिम तलाव ठेवण्यात आले आहेत. मोठय़ा मूर्ती फुटाळा तलावातच विसर्जित केल्या जाणार आहेत. तलावाच्या ठिकाणी निरीक्षण मनोरा, पोहण्यात तरबेज शिपाई, विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे.

यावर्षी नागपूर जिल्ह्य़ात ११०० च्यावर लहान-मोठय़ा मूर्तीची स्थापना झाली आहे. मंगळवारी दुपापर्यंत घरगुती मूर्तीचे विसर्जन होण्याची शक्यता आहे. मात्र, सार्वजानिक गणेश मंडळांचे विसर्जन उशिरा रात्रीपर्यंत चालते. विसर्जनाच्या निमित्ताने विविध जलाशयांवर होणारी गणेश भक्तांची गर्दी लक्षात घेता पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. काही स्वयंसेवी संघटना तलाव परिसरात मदतीसाठी तैनात राहणार आहेत.

रेशीमबागमधील नागपूर राजा, महालचा राजा, दक्षिणामूर्तीमधील गणेश आणि एचबी टाऊनमधील विदर्भाच्या राजाची मिरवणूक मंगळवारी सकाळी निघणार आहे. डीजेवर असलेली बंदी बघता ढोल (संदल) लेझिम पथके, ध्वजपथके, बँड पथक यांची मागणी वाढली आहे.

येथे कृत्रिम तलाव आहेत

महापालिकेने विविध भागात १९० च्यावर कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. त्यात ६५ लाकडी कुंड, ११० रबरी कुंड आणि ३६ जमिनीत खड्डे तयार करून विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहेत. पाच विसर्जन कुंड स्थायी स्वरूपाचे असून त्यात लक्ष्मीनगर झोनअंतर्गत सोनेगाव तलाव, अजनी चौक, हनुमाननगर झोनअंतर्गत बिंझाणी महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात, गांधीसागर तलाव आणि मंगळवारी झोनअंतर्गत पोलीस लाईन टाकळी आदीचा समावेश आहे. भागात स्थायी विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहे. विसर्जन कुंड शोधण्यासाठी महापालिकेने मोरया या नावाने अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप तयार केले आहे.

 

शहरातील सर्व तलावाच्या ठिकाणी निसर्गप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी निर्माल्य जमा करण्यासाठी उभे राहणार आहेत. तलाव आणि विहिरीत निर्माल्य न टाकता घरी किंवा परिसरातील मोकळ्या जागेत खड्डा करून त्यात टाकावे. तसेच विसर्जन स्थळी ठेवण्यात आलेल्या कुंडाचा वापर करावा. महापालिकेने फिरत्या निर्माल्य रथाचीही सोय केली आहे.