तीन हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त

गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून त्यामाध्यमातून गणेश भक्तांवर लक्ष ठेवले जाणार आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली.

गणरायाचे आगमन आणि उत्सव शांततेत पार पडला असून आता विघ्नहर्त्यांला निरोप देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पोलिसांनी विसर्जनाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी आणि निकोपपणे विसर्जन होण्यासाठी ठिकठिकाणी १०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले. विसर्जनादरम्यान पोलीस आयुक्तापासून ते शिपायापर्यंत जवळपास ३ हजार पोलिसांचा ताफा रस्त्यांवर व विसर्जनाच्या ठिकाणी तैनात असेल. यात राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडीही सुरक्षेत राहणार असून पोलीस प्रशिक्षण केंद्रातील १०० प्रशिक्षणार्थी पोलीसही पोलिसांच्या मदतीला असतील. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या नेतृत्वात ५ पोलीस उपायुक्त, ६ सहाय्यक पोलीस आयुक्त, ३६ पोलीस निरीक्षक, ८१ सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, गुन्हे शाखेचे पाच पथक, दोन राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकडय़ा आणि स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी असे तीन हजार कर्मचारी असा फौजफाटा तैनात असेल. यात सशस्त्र पथके, तीन शीघ्र कृती पथक, दंगल नियंत्रण पथक आदींचाही समावेश आहे, अशी माहिती बोडखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलीस आयुक्त श्यामराव दिघावकर, उपायुक्त नीलेश भरणे, रवींद्र परदेशी उपस्थित होते.

तलावावर ७६० मंडळांद्वारे विसर्जन करण्यात येणार असून तेथे उत्तर, दक्षिण आणि मध्य असे तीन विसर्जनस्थळ निर्माण करण्यात आले आहेत.

नऊ ठिकाणी विसर्जन

फुटाळा तलाव, सक्करदरा तलाव, सोनेगाव तलाव, गांधीसागर तलाव, नाईक तलाव, कोराडी तलाव, जुनी कामठी परिसरातील महादेव घाट, कळमना तलाव आणि कळमना खदान या नऊ ठिकाणी विसर्जनाची सुविधा तयार करण्यात आली आहे. यंदा १ हजार ६९ सार्वजनिक गणपती असून त्यापैकी ५ सप्टेंबरला ६४९, ६ सप्टेंबरला ३६९ आणि ७ सप्टेंबरला १७ मंडळांद्वारा विसर्जन करण्यात येणार आहे. एकटय़ा फुटाळा तलावावर ७६० मंडळांद्वारे विसर्जन करण्यात येणार असून तेथे उत्तर, दक्षिण आणि मध्य असे तीन विसर्जनस्थळ निर्माण करण्यात आले आहेत.

पाचशेवर वाहतूक पोलीस

सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस उपायुक्त रवींद्र परदेशी यांच्या नेतृत्वात ७ पोलीस निरीक्षक, ४५ सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक आणि ५०० कर्मचारी रस्त्यांवर तैनात असतील. कोणत्याही आकस्मिक सेवेसाठी कर्मचारी तत्पर राहतील, असेही बोडखे म्हणाले.