अंगावर कार नेण्याचा प्रयत्न

नागपूर : अवैधपणे वाळू भरलेल्या ट्रकवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर कार चढवून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी उड्डाणपुलाच्या परिसरात पारडी मार्गावर घडली.

याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी तीन वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनील वासुदेवराव साळवे (४३) हे नायब तहसीलदार आहेत. वाळू तस्करांविरुद्ध कारवाईसाठी मंगळवारी सकाळी ते दोन मंडळ अधिकारी आणि चार तलाठय़ांसह शहराबाहेर  जात होते. दिघोरी उड्डाणपुलाजवळ पारडी रस्त्यावर एमएच-४०, एके-८०५६ आणि एमएच-३६, एफ-४१५७ क्रमांकाचे ट्रक उभे होते. त्यात वाळू भरली होती. ट्रकची चौकशी करून वाहनचालकांना दस्तावेज मागितले. वाळूची रॉयल्टी पावती मागितली, पण ते देत नव्हते. त्यावेळी एमएच-४१, एए-८१०० क्रमांकाची मर्सिडिज बेंझ कार तेथे आली. त्या कारचालकाने महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर कार नेण्याचा प्रयत्न केला. महसूल कर्मचारी जीव वाचवण्यासाठी मागे सरकले. कारचालकाने त्यांना शिवीगाळ केली व ट्रक चालकाला ट्रक घेऊन पळण्यास सांगितले. तीनही वाहने वेगवेगळया दिशेनी पळून गेली. महसूल अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक स्वप्निल वाघ यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल केला.

त्या कारचालकाने महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर कार नेण्याचा प्रयत्न केला. महसूल कर्मचारी जीव वाचवण्यासाठी मागे सरकले. कारचालकाने त्यांना शिवीगाळ केली व ट्रक चालकाला ट्रक घेऊन पळण्यास सांगितले. तीनही वाहने वेगवेगळया दिशेनी पळून गेली.