16 January 2019

News Flash

आंबेकरला कोठडीतच ठेवण्याची पोलिसांची योजना

२२ जानेवारी २०१७ रोजीची ही खुनाची घटना आहे. बाल्या गावंडे हा आपला काटा काढेल, अशी भीती आंबेकरला होती.

गुन्हा सिद्धीसाठी अभ्यास; १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

कुख्यात बाल्या गावंडे हत्याकांडात नऊ आरोपी निर्दोष सुटल्यानंतर ‘डॉन’ संतोष आंबेकर हा न्यायालयात शरण आला. मात्र, आंबेकरला इतर आरोपींप्रमाणे संशयाचा लाभ मिळू नये  व त्याच्याविरुद्धचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. जुन्या आदेशाचा अभ्यासही करण्यात येत आहे. या प्रकरणात शुक्रवारी त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

२२ जानेवारी २०१७ रोजीची ही खुनाची घटना आहे. बाल्या गावंडे हा आपला काटा काढेल, अशी भीती आंबेकरला होती. यातूनच त्याने बाल्याच्या हत्येची सुपारी योगेश कुंभारेला दिली. योगेशने शुभम व अन्य साथीदारांच्या मदतीने बाल्या गावंडे याच्या हत्येचा कट  रचला.  बाल्या ओळखीचा असल्याने त्याला सहजासहजी संशय येणार नव्हता. योगेशने बाल्याला २२ जानेवारीला कार्यक्रमासाठी कळमन्यातील तुकारामनगर येथील घरी बोलावले. तेथे त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह झुडुपी जंगलात फेकला होता. या प्रकरणात कळमना पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली होती. १० मे रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यात संतोष आंबेकर याचेही नाव होते. हत्याकांडानंतर मात्र संतोष पसार झाला. तेव्हापासून तो फरार होता. न्यायालयानेही फरार घोषित करून संतोषविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. या प्रकरणातील इतर आठ आरोपींची १२ डिसेंबरला सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली. त्यानंतर आंबेकर हा न्यायालयाला शरण येईल, अशी माहिती होती. गुरुवारी सकाळी ११.१५ वाजता तो प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ओ. जैन यांना शरण आला.

त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. आज कळमना पोलिसांनी त्याची १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळवली. इतर आरोपी निर्दोष सुटल्यानंतर आपण काही दिवसांनी जामिनावर कारागृहाबाहेर निघण्याच्या विश्वासाने त्याने आत्मसमर्पण केल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

मात्र, पोलीस त्याचा कारागृहातील मुक्काम अधिकाधिक दिवस वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याकरिता या हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार त्यालाच दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. शिवाय इतर आरोपींसंदर्भात सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाचाही वरिष्ठ पोलीस अधिकारी अभ्यास करीत आहेत. त्यामुळे आंबेकरला जामीन मिळणे कठीण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२०१९ च्या निवडणुकीचेही आखाडे

आंबेकर आजवर फरार होता. मात्र, २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका आहे.  निवडणुकीत गुंडांची मदत घेण्यात येत असल्याचे सर्वज्ञात आहे. त्याचे स्थानिक भाजप नेत्यांशी असलेले संबंध लक्षात घेता २०१९ मध्ये तो शहरात असणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीला बराच कालावधी शिल्लक असताना त्याने आत्मसमर्पण करून कारागृहाबाहेर येणे अपेक्षित असून त्यासाठी राजकीय पुढारी पोलीस तपासावर प्रभाव टाकतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First Published on April 14, 2018 2:04 am

Web Title: gangster santosh ambekar nagpur police