22 November 2019

News Flash

कुख्यात गुंड विजय मोहोडची अपहरण करून हत्या

हुडकेश्वर पोलिसांनी अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे

कुख्यात गुंड  विजय ऊर्फ विजू नारायण मोहोड

हुडकेश्वर परिसरात टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता

नागपूर : जुगार अड्डा चालवण्यावरून निर्माण झालेल्या वादात रविवारी रात्री कुख्यात गुंड  विजय ऊर्फ विजू नारायण मोहोड (३२) रा. नरसाळा याचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेने दिघोरी, नरसाळा परिसरात खळबळ उडाली असून त्याचा खून करणारे गुन्हेगारी पाश्र्वभूमी असणारेच आहेत. त्यामुळे परिसरात भविष्यात टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता आहे.

हुडकेश्वर पोलिसांनी अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अभय नामदेव राऊत रा. विनोबा भावेनगर, दिलीप कृष्णा ठवकर रा. आदर्शनगर, राहुल बाळकृष्ण कार्लेवार रा. शिवाजीनगर, कोतवाली, स्वप्निल सुभाष

साळुंखे रा. ओमनगर, सक्करदरा, निखिल तिडके, काल्या, लल्ला मिश्रा, अर्जुन रेड्डी आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात अनेकांवर खून, मारहाण, चोरी, लुटमारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत धामना परिसरात विजय मोहोडचा जुगार अड्डा सुरू होता, अशी माहिती आहे. काही दिवसांपूर्वी अभय राऊत व त्याच्या साथीदारांनी धामन्यापासून काही अंतरावर खरसोली गावात जुगार सुरू केला होता. पूर्वी अभय कळमेश्वरमध्ये जुगार अड्डा चालवायचा. यातील अनेक गुन्हेगार पूर्वी राजू भद्रे टोळीसोबत जुळलेले होते. त्यामुळे विजय व अभय हे एकमेकांना ओळखत होते. एक दिवस विजयने अभयला भेटायला बोलावून त्याला हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत जुगार न चालवता कळमेश्वरमध्ये जाण्यास सांगितले. पण, अभयने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर दोघांमध्ये तणाव वाढत गेला.

रविवारी दुपारी विजय हा त्याचा मित्र चंद्रशेखर वैद्य, रूपेश बोंडे आणि इतरांसह पिपळा फाटा परिसरात अमीत सावजी भोजनालयात जेवायला गेला होता. सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास अभय राऊत २० ते २५ जण घेऊन चार कारने त्या ठिकाणी पोहोचला. त्या ठिकाणी विजय व त्याच्यात बराच वेळ चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी विजयला धमकावण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटात तणाव निर्माण झाला व त्यांनी विजयला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये डांबून सोबत घेऊन गेले. त्यानंतर चाकू भोसकून त्याचा खून केला. सोमवारी सकाळी वेलाहरी गावाजवळ त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर चाकूचे जवळपास ४० घाव होते. पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. सोमवारी त्याच्यावर दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरात तणाव असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

एकत्र जुगार चालवण्याचा प्रस्ताव

अमित सावजी भोजनालय परिसरात चर्चा सुरू असताना अभयने आपल्या साथीदारांच्या मदतीने विजयला धमकवायला सुरुवात केली. त्यावेळी विजयने त्याला जुगार अड्डा बंद करण्यास सांगितले. तर अभयने विजयला एकत्र जुगार अड्डा चालवण्याचा प्रस्ताव दिला. पण, विजय प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर त्याचे अपहरण केले. विजयचा चुलत भाऊ देविदास मोहोड याच्या तक्रारीवरून रविवारी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

आणि मृतदेह सापडला

अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. अपहरण करणारे कुख्यात गुंड असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. विजयच्या मोबाईल क्रमांकाचे टॉवर लोकेशन घेतले असता वेलाहरी गावाजवळ दिसले. गावाच्या परिसरात शोधमोहीम राबवली असता त्याचा मृतदेह भेटला.

तीन महिन्यांपूर्वी अभय कारागृहाबाहेर

गेल्यावर्षीय अभय राऊतने  साथीदारांच्या मदतीने दारू पाजून पलाश दिवटे याचा खून केला होता. त्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तीन महिन्यांपूर्वी तो जामिनावर कारागृहाबाहेर आला. कुख्यात गुंड असताना अभयला केवळ तीन महिन्यात जामीन कसा मिळाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. २०१६ मध्ये विजय मोहोड याने अनैतिक संबंधाच्या संशयातून अक्षय तितरमोर याचा खून केला होता. काही दिवसांपूर्वी कुख्यात मारोती नव्वा याच्या अपहरणावरून  त्याचे नाव पुन्हा चर्चेत आले होते.

First Published on June 18, 2019 12:10 am

Web Title: gangster vijay mohod murder in nagpur
Just Now!
X