उमेदवारी मिळविण्यासाठी मुलाखतीला हजेरी

राजकारण आणि गुन्हेगारी यांचे अतूट नाते आहे.  गुन्हेगारीत नाव झाल्यावर राजकारणात नशीब आजमावून मलीन प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. यात अनेकांना यश येते, तर काहीजण त्यासाठी निरंतर प्रयत्नरत असतात. आता उमेदवारी मिळविण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांसोबत गुन्हेगार आणि कुख्यात गुंडही मोर्चेबांधणी करीत असल्याचे दिसते.

साम, दाम, दंड, भेद आदींचा वापर करून विजय संपादन करण्यासाठी गुंडांचा वापर होतो.  गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेले अनिल माधोरावजी धावडे याने भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. सध्या तो गरोबा मैदान प्रभागाचा नगरसेवक असून त्याच्यावर लकडगंज, कळमना, सक्करदरा, सदर आदी ठिकाणी जवळपास ११ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध एकदा मोक्काही लागला होता. त्यापूर्वी कुख्यात भरत मोहाडीकर हाही नगरसेवक होता. त्यानंतर त्याचा खून झाला होता.  आता सध्या शहरात महापालिका निवडणुकीचे वारे वाहात असून गुन्हेगारीशी संबंधीत राजकीय पुढारी होण्याचे वेध लागले आहेत. यात प्रामुख्याने  मधु कांबळे, नागेश शहारे आणि बाल्या माने आदींचा समावेश आहे. याशिवाय अजनी प्रभागाचा माजी नगरसेवक संजय तिवारी याचेही भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. तर जगदीश ग्वालवंशीही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात असून त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय डॉन संतोष आंबेकर याच्या पत्नीने भाजपकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे.

बाल्यावर आठ तर नागेशवर अठरा गुन्हे

बाल्या माने याच्यावर १९९९ पासून ते २००८ पर्यंत दोन खुन्याच्या गुन्ह्य़ासह एकूण आठ गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर नागेश गोपीचंद शहारे याच्यावर अजनी, इमामवाडा, जरीपटका, सक्करदरा, सीताबर्डी आणि गणेशपेठ या पोलीस ठाण्यामध्ये १९९६ पासून ते २०१६ पर्यंत एकूण अठरा गुन्हे दाखल आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने मारहाण, अशा गंभीर गुन्ह्य़ाचा समावेश आहे. मधू दिनकर कांबळे याच्यावर जरीपटका आणि लकडगंज या दोन पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे आहे.