वेणा नदीतील घटना

गणेश विसर्जनादरम्यान हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेणा नदीत दोघेजण बुडाले. बुडालेले दोघेही काका-पुतणे असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

सुरेश शिवराम फिरके (४८) व अजिंक्य रमेश फिरके (१८)  दोन्ही रा. डिगडोह देवी, एमआयडीसी अशी नदीत बुडालेल्या काका-पुतण्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सुरेश व अंजिक्य हे दोघे गणेश विसर्जनासाठी खैरी पन्नासे गावाजवळील वेणा नदी येथे आले. त्यांनी गणेशविसर्जन केले. त्यानंतर दोघे आंघोळ करीत होते. सुरेश हे पाण्याच्या प्रवाहात वाहायला लागले. त्यांना वाचवण्यासाठी अंजिक्य पाण्यात गेला. दोघेही नदीच्या पाण्यात बुडाले. ग्रामस्थांनी घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच हिंगणा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सप्ना क्षीरसागर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. अग्निशमन व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाला बोलावण्यात आले. पथकाने दोघांचा शोध घेतला. मात्र वृत्त लिहिपर्यंत दोघेही आढळून आले नाही.