नागपूर पालिकेकडे व्यवस्थापन यंत्रणेचा अभाव

नागपूर शहरातील भांडेवाडी येथील कचराभूमी परिसरात मोठी लोकवस्ती आहे. सडलेल्या कचऱ्यातील गाळ झिरपून दूषित झालेले भूजल आणि कचऱ्याला वारंवार लागणाऱ्या आगींमुळे परिसरातील सुमारे १५ वस्त्यांमधील नागरिकांना श्वसन व इतर आजारांनी ग्रासले आहे.

सुमारे ३० लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर शहराचा कचरा भांडेवाडीत गोळा केला जातो. या परिसरातील प्रभाग क्रमांक २६ आणि बीडगाव ग्रामपंचायतीत सुमारे २५ ते ३० हजार लोकसंख्या आहे. कचऱ्याची दरुगधी ही या भागातील रहिवाशांची डोकेदुखी ठरली आहे.

शहराच्या पूर्व दिशेला सुमारे ५५ एकरवर ही भांडेवाडी कचराभूमीत आहे. तिथे रोज ११०० ते १२०० मेट्रीक टन कचरा गोळा केला जातो. नागपूर महानगरपालिकेकडे कचरा वर्गीकरणाची पुरेशी व्यवस्था नाही. केवळ २१ ते २२ टक्के कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार कचराभूमीला ५०० मीटरचा बफर झोन असला पाहिजे. परंतु, नागरी वस्त्या आणि कचराभूमी यांच्यात कुठलेच अंतर नाही. यामुळे परिसरातील वस्त्यांना प्रदूषणाचा फटका बसतो. परिसरातील सुमारे दोन ते तीन किमी अंतरावरील विहिरी, विंधन विहिरी दूषित झाल्याने त्यातील पाणी प्यायल्याने नागरिकांना पोटाचे विकार आणि त्वचाविकार झाले आहेत. परिसरात दिवसभर उडणाऱ्या धूलिकणांमुळे श्वसनाचे विकार मोठय़ा प्रमाणात जडले आहेत, असे या वस्त्यांना भेट दिल्यावर दिसून येते. आगीच्या धुराची सर्वाधिक झळ वयोवृद्ध आणि लहान मुलांना बसते. भांडेवाडी कचराभूमीमुळे उच्च पातळीचे प्रदूषण होत असल्याचे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) महापालिकेला सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

या परिसरात वारंवार आगी लागतात. तिथे ८ फेब्रुवारी २०१८ ला मोठी आग लागली होती. त्यानंतर आग सलग सहा-सात दिवस ती धुमसत होती. याशिवाय कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून सतत धूर निघत असतो.

भांडेवाडी येथून कचराभूमी हटवण्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलने झाली. विरोधी पक्षात असताना भाजपचे आमदार कृष्णा खोपडे हे त्यासाठी आग्रही होते. परंतु, कचराभूमी अद्याप आहे तिथेच आहे. नागपूर महानगर प्रादेशिक विकास आराखडय़ामध्ये बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वस्तीत कचराभूमीसाठी (घनकचरा व्यवस्थापन) जागा आरक्षित करण्याचे प्रस्तावित आहे.

खतनिर्मिती, वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित

कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा एका खासगी कंपनीचा प्रकल्प सुरू आहे. आता महापालिकेचा गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प सुरू होत आहे. या प्रकल्पाची क्षमता दररोज ६० ते ७० मेट्रिक टन एवढी राहील. कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. यात दररोज सुमारे ८०० मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मित केली जाईल. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शहरातील बहुतांश कचऱ्याचा प्रश्न सुटू शकेल. तसेच ‘बॉयो-मायनिंग’ प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे कचऱ्याचे ढिगारे कमी होतील आणि जमीन मोकळी होईल, असा दावा नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी केला.

फक्त २१ टक्के कचऱ्याचे वर्गीकरण

नागपूर शहरात रोज ११०० ते १२०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. महानगरपालिककडे ओला कचरा आणि सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे केवळ २१ ते २२ टक्के कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. उर्वरित सर्व कचरा एकत्रित जमा केला जातो.

काही सोसायटय़ांचा पुढाकार

नागपूर शहरातील काही सोसायटय़ांमध्ये कचऱ्याची जागच्या जागी विल्हेवाट लावण्याची व्यवस्था आहे. गणेशपेठेतील आनंदम हाऊसिंग सोसायटी, विदर्भ क्रिकेट असोसिएशन, सिव्हिल लाइन्स, हॉटेल रॅडिसन ब्लू, विष्णूजी की रसोई, अशोक चौकातील होम फॉर एजेड अ‍ॅण्ड हॅण्डिकॅप या संस्थेत तसेच इतर १० सोसायटय़ांमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सोय आहे. या सोसायटय़ांमध्ये ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. महानगरपालिका सुका कचरा गोळा करते.