निविदा काढण्यापूर्वीच कंत्राटदारांना कामांचे वाटप

शहरातील विविध भागात महापालिका १२ नव्या उद्यानाची निर्मिती करणार आहे. मात्र, ही कामे निविदा काढण्यापूर्वीच कंत्राटदारांना  देण्यात आल्याने संशय निर्माण झाला आहे. हे कंत्राटदार भाजपच्या मर्जीतील असल्याची माहिती आहे.

शहरातील महापालिकेची अनेक उद्याने ओसाड झाली आहेत. त्याच्या जागेवर  आणि काही इतर ठिकाणी नवीन उद्याने तयार केली जाणार आहेत. या संदर्भातील प्रस्ताव गेल्यावर्षी स्थायी समितीने मंजूर करून तो प्रशासनाकडे पाठवला होता. यासाठी रितसर निविदा काढणे अपेक्षित होते. मात्र, त्यापूर्वीच कंत्राटदारांना कामे देण्यात आली आहे.

त्यात पूर्व नागपुरातील चार, तर दक्षिण नागपुरातील तीन उद्यानांचा समावेश आहे. बहुतांश उद्यानांची कामे सत्ताधारी भाजप नेत्यांशी जवळीक असणाऱ्या कंत्राटदारांना गेल्या काही वर्षांत देण्यात आली आहेत. त्यांच्याकडे उद्यानाची निगा राखण्यासोबतच संचालनाची जबाबदारी आहे. मात्र, गेल्या काही दिवसात पाणी टंचाईमुळे  उद्यानांची दुर्दशा झाली आहे. देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. उद्यानात सायंकाळी येणाऱ्या आबालवृद्धांना ‘घर बरे, पण उद्यान नको’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

शहरामध्ये नागपूर सुधार प्रन्यासची शहरात लहान-मोठी मिळून ४९ उद्याने, तर महापालिकेची ७० उद्याने आहेत. या उद्यानांमधील पिण्याच्या पाण्याची सोय, पक्क्या बांधकामाची किंवा फायबरची प्रसाधनगृहे, सूचनाफलक, तक्रार रजिस्टर, देखभालीसाठी माळ्याचे निवासस्थान, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी झोपाळे, घसरगुंडी इत्यादी  खेळण्यांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक उद्यानांमध्ये केवळ सांगाडे शिल्लक आहेत. शहरातील बहुतांश उद्यानात व्यायामासाठी विविध साहित्य लावण्यात आले आहे. मात्र, त्याची देखभाल केली जात नाही.