|| राखी चव्हाण

केंद्राच्या योजनेतून नागपुरात चार नवी उद्याने; तुलसी विहारमध्ये फुलपाखरांना आकर्षित करणारे वृक्ष

विकासकामांमुळे होणाऱ्या प्रदूषणाने उपराजधानीतील नागरिकांचा श्वास कोंडला जात असून शहरातील उद्यानांचीही दुरवस्था झाली आहे. त्या पाश्र्वभूमीवर आता केंद्र शासनाच्या योजनेतून हिरवळीवर आधारित नवी उद्याने शहरात तयार होत आहेत. दोन उद्याने पूर्णपणे तयार झाली असून दोन उद्याने पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासची शहरातील उद्याने अपुरे मनुष्यबळ आणि देखभालीअभावी ओस पडलेल्या उद्यानांसाठी केंद्राची ‘अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अ‍ॅन्ड ट्रान्सफॉर्मेशन’ ही योजना नवसंजीवनी देणारी ठरली आहे. चार वर्षांपूर्वी केंद्राने ही योजना जाहीर केली होती. नागरिकांना शुद्ध हवा पुरवणारी आणि पर्यावरणाचा समतोल राखणारी उद्याने तयार करणे हा याचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी कोटय़वधीचा निधी दिला जातो.

उपराजधानीला पहिल्या वर्षांत मिळालेल्या एक कोटी रुपयातून काटोल मार्गावरील जागृतीनगर फ्रेंड्स कॉलनी आणि शांतीनगर तुलसीविहार अशी दोन नवीन उद्याने तयार करण्यात आली. त्यात  प्रामुख्याने हिरवळीवरच भर देण्यात आला. त्यामुळे ही उद्याने शुद्ध हवेचा स्रोत ठरली आहेत. विशेष म्हणजे, तुलसी विहार उद्यानात फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या झाडांवर भर देण्यात आला आहे. याठिकाणी असणाऱ्या नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र लावून हे पाणी उद्यानासाठी वापरण्याचा प्रस्ताव असून ती जबाबदारी महापालिकेची आहे. दुसऱ्या वर्षी मिळालेल्या दीड कोटी रुपयातून शास्त्री लेआऊट आणि छत्रपतीनगरातील उद्यान विकसित करण्यात येत आहे.

राज्यशासन पुरस्कृत केंद्राची ही योजना आहे. यात हिरवळीवर भर देण्यात आला असून हरितक्षेत्र वाढवणे हा याचा प्रमुख उद्देश आहे. त्याकरिता नवीन उद्याने विकसित करायची आहेत. उद्यानाचा विकास आणि व्यवस्थापनासाठी दिल्लीस्थित ओअ‍ॅसिस कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. याकरिता ५० टक्के निधी केंद्र, २५ टक्के निधी राज्य आणि २५ टक्के निधी महापालिकेला खर्च  करायचा आहे. मिळणाऱ्या एकूण निधीतून ८० टक्के निधी हा फक्त हरितीकरण व त्याच्याशी संबंधित कामांवर तर २० टक्के निधी स्थापत्य कामावर खर्च करायचा आहे.     – अमोल चोरपगार, उद्यान अधीक्षक