परिवहन खात्याच्या ‘सारथी’ सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा

महेश बोकडे, नागपूर</strong>

राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सारथी या संगणकीय सॉफ्टवेअरमध्ये मंगळवारी सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या बुधवारपासून राज्यातील कोणत्याही कार्यालयात वाहन चालवण्याचा शिकाऊ आणि कायम परवाना घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

राज्यात प्रत्येक वर्षी साधारणत: सर्वच संवर्गातील २५ ते २७ लाख परवाने दिले जातात. त्यात १५ लाख शिकाऊ तर १० ते १२ लाख कायम संवर्गातील परवान्यांचा समावेश असतो. हे परवाने देण्यासाठी राज्यात ५० प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांची सुविधा आहे. येथील संगणकातील सारथी या ऑनलाईन प्रणालीत वाहनांशी संबंधित परवान्यासह वाहन नोंदणी आणि वाहनांशी संबंधित प्रत्येक कामाची ऑनलाईन नोंद होते. सध्या शिकाऊ आणि कायम वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करून वेळ घ्यावी लागते. आता केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करत १ सप्टेंबरपासून त्याच्या अंमलबजावणीबाबत अधिसूचना काढली. त्यात उमेदवारांना कोणत्याही कार्यालयातून शिकाऊ आणि कायम परवाना घेण्याची मुभा दिली गेली आहे. विलंबानेच का होईना केंद्राच्या राष्ट्रीय सूचना केंद्र या संस्थेकडून आरटीओ कार्यालयातील सारथी या सॉफ्टवेअरमध्ये हैदराबादच्या कार्यालयातून दुरुस्ती करण्यात आली आहे. सुमारे महिन्याभरापूर्वी शिकाऊ परवाना घेतलेल्या व्यक्तीने पूर्वी ऑनलाईन एखाद्या कार्यालयाची वेळ घेतली असल्यास ती रद्द करून नव्याने या उमेदवाराला इतर कार्यालयातील ऑनलाईन वेळ घेता येईल. दरम्यान, सध्या प्राथमिक स्तरावर या नवीन बदलांमध्ये बरेच तांत्रिक दोष येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन बदल सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढीव दंडाच्या सुधारणेबाबत मंगळवारीही काही झाले नसून परिवहन खात्याचे सर्व अधिकारी संभ्रमातच असल्याचे चित्र होते.

असे नवीन बदल आहेत

* ऑटोरिक्षा परवान्यासाठीच्या अर्जातून वयाचा उल्लेख काढला

* व्यावसायिक वापराच्या वाहनाच्या नूतनीकरणाची मुदत ३ ऐवजी ५ वर्षे

* केमिकल टँकरच्या नूतनीकरणानंतरची मुदत १ ऐवजी ३ वर्षे

‘‘सारथी सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा झाल्यामुळे उमेदवारांना आता वाहन चालवण्याचा राज्यातील कोणत्याही आरपटीओ कार्यालयातून परवाना घेता येईल. सुरुवातीला काही तांत्रिक दोष येण्याची शक्यता नकारता येत नाही. परंतु वेळेनुरूप त्यात संबंधित कंपनीकडून सुधारणा झाल्यावर नागरिकांना अद्ययावत सेवा मिळेल. ही दुरुस्ती काही दिवस चालणार आहे.’’

– संदेश चव्हाण, उपपरिवहन आयुक्त (संगणक), मुंबई.