तरुणांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले; पोलीस शिपाईही मदतीला धावला

आईवडिलांच्या अनैतिक संबंधांना कंटाळून फुटाळा तलावात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला तिच्या तीन मित्रांनी वाचवले. तरुणीची वेळ आली होती, पण काळ आला नव्हता, अशी प्रतिक्रिया शेवटी फुटाळा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. त्यानंतर तरुणीला अंबाझरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आकाश हरिदास गौरखेडे (२६), आकाश सुरेश डहाट (२१) आणि अभिषेक किरण गेडाम (२०) सर्व रा. हजारी पहाड अशी तरुणीला वाचवणाऱ्यांची नावे आहेत. मानकापूर परिसरात राहणारी मानसी (नाव बदललेले) असे तरुणीचे नाव आहे. गौरखेडेचे सीताबर्डीमध्ये महिला प्रसाधनांचे दुकान आहे. तर डहाट हा आर.एस. मुंडले महाविद्यालयात प्रथम वर्षांला शिकत असून अभिषेक हा तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाला आहे. सोमवारी सकाळी आकाशची दुचाकी रविनगर येथील होंडाच्या शोरूममध्ये सव्‍‌र्हिसिंगला देण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना पेट्रोल संपल्याने त्यांनी दुचाकी उभी करून पेट्रोल मागवले. दरम्यान, ते फुटाळा तलाव परिसरात फिरत होते. त्यावेळी मानसी तलावाच्या काठावर बसून रडत होती. ती संकटात असावी म्हणून गौरखेडेने तिला विचारणा केली. मात्र, तिने त्यांना परत जाण्यास सांगितले. ती सतत रडत होती व घरच्यांना शिव्या घालत होती. दरम्यान, या तरुणांनी गस्तीवर असणारे पोलीस शिपाई माधव शिंदे यांना माहिती दिली. ते येताना पाहून मानसीने तलावात उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गौरखेडेने तिला पाठीमागून पकडले. त्यामुळे ती बचावली. त्यानंतर शिंदे यांच्या मदतीने तिला महिला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दुपारी तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. तीन तरुणांनी तिच्यावर नजर ठेवल्यामुळे मोठा अपघात टळला, हे विशेष.

पंधरा दिवसांपासून वसतिगृहात

मानसी ही सिव्हिल लाईन्स परिसरातील महाविद्यालयात बी.एस्सी. अभ्यासक्रमाला शिकत आहे. तिला एक भाऊ आहे. वडील सेवानिवृत्त आहेत. अनेक वर्षांपासून आई व वडिलांचे बाहेर अनैतिक संबंध असून ते एकमेकांच्या गैरहजेरीत आपल्या जोडीदाराला घरापर्यंत घेऊन यायचे. तिने अनेकदा आईवडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी तिने पंधरा दिवसांपूर्वी घर सोडले आणि सदर येथील एका वसतिगृहात राहू लागली. मात्र, दररोज तिला आईवडिलांच्या विचारांनी ग्रासले होते. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी ती त्याकरिता फुटाळा तलाव परिसरात आली. अंबाझरी ठाण्याच्या महिला शिपायांनी तिच्याशी संवाद साधून सर्व हकीकत समजून घेतली. तिच्या आईवडिलांना व मावशीला बोलावून घेतले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आशीष कोहळे यांनी तिच्या आईवडील व मुलीचे बयाण नोंदवून घेतले. तिच्या आईवडिलांनी पोलिसांची माफी मागितली. त्यानंतर मानसीने आईवडिलांसोबत न जाता मावशीकडे राहण्याचा विचार व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी बेझनबागमध्ये राहणाऱ्या मावशीकडे तिला सोपवले.