शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार

नागपूर : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात शहरातील एका शाळेतील एका विद्यार्थिनीला आणि एका विद्यार्थ्यांला दोन वेगवेगळ्या गुणपत्रिका मिळाल्याने शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या दोन गुणपत्रिकांवरील नाव आणि बैठक क्रमांक एकच असला तरी प्रत्येक विषयासाठी मिळालेले गुण वेगळे असल्याने शाळा प्रशासनही चकित झाले असून शिक्षण मंडळाच्या या गोंधळावर टीका होत आहे.

टाळेबंदीमुळे यंदा शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल उशिरा जाहीर झाला. ऐन परीक्षेच्या दिवसातच राज्यात करोनाचा संसर्ग पसरण्यास सुरुवात झाल्याने दहावीचा शेवटचा पेपरही रद्द करण्यात आला होता. तर टाळेबंदीमुळे उत्तरपत्रिकाही परीक्षा केंद्रांमध्ये अडकून पडल्या होत्या. त्यामुळे वेळेत निकाल जाहीर करण्याचे शिक्षण मंडळापुढे आव्हान होते. कमी दिवसात निकाल तयार करण्याच्या प्रयत्नात मंडळाकडून चक्क गुणपत्रिका तयार करण्यात गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. शहरातील एका विद्यार्थिनीने ऑनलाईन निकाल शोधला. यावेळी बैठक क्रमांकाच्या मदतीने ऑनलाईन निकाल शोधला असता तिला सर्व सहा विषयांमध्ये ३५ गुण मिळाल्याचे दिसून आले. यामुळे ती चकित झाली. सर्व विषयात सारखेच गुण मिळणे अशक्य आहे. त्यामुळे तिने शाळेत संपर्क साधला. त्यानंतर पुन्हा बैठक क्रमांक टाकून गुणपत्रिका पाहिली असता वेगळी गुणपत्रिका हाती लागली. त्यामुळे शिक्षकही अचंबित झाले. या दोन्ही गुणपत्रिकेमध्ये विद्यार्थिनीचे नाव आणि बैठक क्रमांक सारखा आहे. मात्र, तिला मिळालेल्या सहाही विषयातील गुणांमध्ये मोठी तफावत आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या दहावी परीक्षेच्या गुणपत्रिकेत असा गोंधळ झाल्याने शिक्षण मंडळाच्या कारभारावर टीका होत आहे.

असा कुठलाही तांत्रिक गोंधळ झाला असल्यास शाळेने आमच्याकडे लेखी अर्ज करावा. त्याची योग्य तपासणी होईल. विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही.

– रविकांत देशपांडे, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ नागपूर.