News Flash

शहरात यंदाही मुलींचीच बाजी

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज सोमवारी जाहीर करण्यात आला. यात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. सेंटर पॉइंट शाळा वर्धमाननगरची दिव्या सूचक ९९.२ टक्के तर भवन्स श्रीकृष्णनगरची केतकी मोघे ९८.६ टक्क्यांसह उत्तीर्ण झाली. गुणवंतांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण अधिक आहे.

करोनामुळे बारावीचे काही पेपर रद्द झाल्याने ‘सीबीएसई’ने सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहीर केला. त्यामुळे यंदा गुणवत्ता यादी जाहीर झाली नसली तरी गुणवंतांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे. उपराजधानित सीबीएसईच्या १७ शाळा असून यातील जवळपास चार हजार विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली होती. यात भवन्स, सेंटर पॉइंट, नारायणा, जैन इंटरनॅशनल, रॉयल गोंडवाना, माउंट फोर्ट शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. भवन्स सिव्हील येथील ३० टक्के विद्यार्थी विज्ञान शाखेत तर वाणिज्य शाखेच्या २९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण घेतले आहे. वाणिज्य शाखेत प्रियादेवी सुथार ९८.६ टक्के, तन्मय डेंबले ९६ टक्के, सेजल मोरे ९५.६ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.  विज्ञान शाखेतून यश अग्रवाल ९६.६ टक्के, साक्षी बोरीकर ९६.६टक्के, प्रेरणा अग्रवाल ९६ टक्के तर अनुष्का प्रकाश ९५.६ टक्क्यांनी उत्तीर्ण झाले. यासह विविध शाळांमधून उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सेंटर पॉइंट शाळा वर्धमाननगरची दिव्या सूचक ९९.२ टक्के, हृदय गोलानी ९७.६टक्के, अर्णब भूमिका ९८ टक्के, आशना चोप्रा ९७.४ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाले. यासह विज्ञान शाखेत नारायणाचा विश्वेस पारगी ९७.२ टक्के व जैन इंटरनॅशनल स्कूलचा मनन अग्रवाल ९६.२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला. सरासरी गुण दिल्याने यंदाच्या निकालात काही प्रमाणात घट झाल्याची भावना शाळांनी व्यक्त केली.

संयुक्त राष्ट्रसंघात काम करायचेय –  केतकी

हा निकाल अपेक्षित होता. पण माझ्या मते, यशाचे काही गुपित नसते. नियमित अभ्यास हेच यशाचे गमक आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये असलेल्या आवडीमुळे भविष्यात संयुक्त राष्ट्रसंघात काम करण्याची इच्छा आहे, असे मत मानव्यशास्त्र शाखेत ९८.६ टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या भवन्स श्रीकृष्णनगरच्या केतकी मोघे हिने व्यक्त केले. दिल्ली विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेणार असल्याचे केतकी म्हणाली. केतकी ही राष्ट्रीय जलतरणपटू असून विभागीय आणि राष्ट्रीय जलतरण स्पध्रेमध्ये अनेक पारितोषके तिने मिळवली आहेत.

‘आत्मनिर्भर भारत’साठी कार्य करणार – दिव्या

शाळेतील सराव परीक्षा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश साध्य करता आहे. आर्थिक विषयात भविष्य घडवायचे असून ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेमध्ये काम करायची इच्छा आहे, असे  सेंटर पॉइंट शाळा वर्धमाननगरची दिव्या सूचक हिने सांगितले. देशाची आर्थिक घडी सुधारण्यासाठी घरगुती उत्पादन वाढविण्यावर भर देणे आवश्यक असल्याचेही तिने सांगितले. या यशाचे श्रेय तिने पालक आणि शिक्षकांना दिले.

अनेक शाळांचा निकाल शंभर टक्के

नागपूर विभागातील अनेक शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. शहरातील सतरा शाळांतील चार हजारांवर विद्यार्थ्यांंनी ही परीक्षा दिली होती.  वाणिज्य आणि मानव्यशास्त्र शाखांमध्ये सर्वच शाळांचा निकाल वाढला आहे. मात्र विज्ञान शाखेच्या निकालात घसरण झाली आहे. गेल्या काही वर्षांंपासून निकालाची टक्केवारी विज्ञान शाखेत घसरत आहे. विद्यार्थी विज्ञान शाखेला अधिक महत्त्व देत असले तरी त्यांचे मुळ लक्ष हे आयआयटी, जेईई परीक्षेकडे असते. त्यामुळे ते बारावीत मिळणाऱ्या टक्केवारीवर कमी लक्ष देतात. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये मिळणारी टक्केवारी महत्त्वाची असते. तेथील प्रवेशाशी बारावीत मिळणाऱ्या टक्केवारीचा फारसा संबंध नसतो. त्यामुळे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांंच्या निकालात काही प्रमाणात घसरण होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 1:48 am

Web Title: girls top in nagpur cbse 12th results announced zws 70
Next Stories
1 मराठी नेतृत्त्व संपवण्यासाठी हिंदीजनांचा कुटील डाव
2 ११ दिवसांच्या अवकाशानंतर पुन्हा खून
3 पुन्हा टाळेबंदीवरुन प्रशासनात मतभिन्नता!
Just Now!
X