24 November 2020

News Flash

सराफा बाजारात एक हजार कोटींची उलाढाल अपेक्षित

आकर्षक दागिन्यांनी दुकाने सजली

फोटो : पीटीआय

’  विजयादशमीसाठी व्यापारी सज्ज  *आकर्षक दागिन्यांनी दुकाने सजली

नागपूर : विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तापकी एक असल्याने या शुभ मुहूर्तावर सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी सराफा बाजारात ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. ग्राहकांकडून दागिने विक्रेत्यांकडे सोन्या-चांदीच्या वस्तू व दागिन्यांची पूर्वनोंदणी होत असून यंदा सराफा बाजारात एक हजार कोटींची उलाढाल व्यापाऱ्यांना अपेक्षित आहे.

करोनामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीत अनेक सण सराफा व्यापाऱ्यांच्या हातून गेले. यंदा मार्चनंतर गुढीपाडवा, रक्षाबंधन, नागपंचमी, अक्षय्यतृतीया तसेच  लग्न सोहळेही झाले नाहीत. त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांचे कोटय़वधींचे नुकसान झाले. मात्र आता बाजारपेठा खुल्या झाल्या असून घटते मृत्यू आणि रुग्णसंख्येमुळे करोनाची भीतीही कमी झाली आहे. त्यामुळे टाळेबंदीत हातातून गेलेल्या सणांची सोने खरेदीची कसर आता दसऱ्यात निघत आहे. यानंतर दिवाळी असल्याने ग्राहकांचा खरेदीकडे ओढा दिसत असून सराफा बाजारपेठ गजबजू लागली आहे. सर्वाच्याच दृष्टीने हे एक चांगले संकेत मानले जात आहे. रविवारी असलेल्या दसऱ्यासाठी सराफा व्यापाऱ्यांकडे ग्राहक दागिने, चांदीच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत.

दागिने व्यापाऱ्यांनी दिवाळी दसऱ्याच्या पाश्र्वभूमीवर आपली दालने सज्ज केली असून दागिन्यांच्या नव्या श्रेणी, डिझाईन आणण्यात आल्यात. पारंपरिक दागिन्यात पाटल्या, मंगळसूत्र, कंठीहार, हिऱ्याच्या अंगठय़ा, चांदीच्या पूजेच्या वस्तू अथवा आदी खरेदीवर ग्राहकांचा जोर आहे. सराफा बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते यंदा आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक सोने-चांदीची खरेदी होईल. गेल्यावर्षीपेक्षा बाजारातील उलाढाल नक्कीच वाढेल. अनेक जण सोन्यात गुंतवणूक करणारे असल्याने  सराफा व्यापाऱ्यांचा दसरा आगामी दिवाळ सणासाठी शुभसंकेत देणारा ठरेल, असा अंदाज लावला जात आहे.

सोन्याच्या वाढत्या दराने खरेदीला प्राधान्य

सध्या २४ कॅरेट सोने ५१ हजारावर गेले असून २२ कॅरेट ४९ हजारावर गेले आहे. सोन्याचे भाव यापुढेही वाढणारच असल्याने सोने खरेदीला पसंती दिली जात आहे. चांदी ४३ हजार ५०० रुपये प्रति किलो असल्याने चांदीच्या वस्तू, माळांची खरेदी जोरात होत आहे. वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यापेक्षा ग्राहकांचा अधिक कल हा सोने-चांदीकडे अधिक दिसत आहे.

झेंडूची फुले १८० रुपये किलो

दसऱ्याच्या निमित्ताने  झेंडूच्या फुलांचे दर प्रति किलो १८० रुपयांवर गेले आहेत.  दसऱ्यानिमित्त घराचे तोरण, वाहनांची पूजा,शस्त्रपूजन केले जाते. यात फुलांचे महत्त्व अधिक असते. मात्र यंदा सर्वच फुलांचे भाव वधारले आहेत.परतीचा पाऊस लांबल्याने फुलशेतीचे मोठे नुकसान झाल्याने सध्या शहरात इतर राज्यातून फुलांची आवक सुरू आहे. झेंडूच्या फुलांचे दर १८० रुपये प्रति किलो  तर शेवंती ४००,लाल गुलाब ४५० रुपये प्रति किलो विकले जात आहे. बंगळूरु येथून मोगरा, जाई, जरभरा, अस्टर फुलांची आवक सुरू आहे. केवळ दसराच नाही तर दिवाळी मध्येही फुलांचे दर वाढलेलेच असतील अशी शक्यता फुले विक्रेत्यांनी व्यक्त केली.

नागरिकांमध्ये करोनाची भीती आता दिसत नाही. तसेच नागरिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे खरेदीचा उत्साह वाढला आहे. करोनामुळे गुढीपाडवा, अक्षय्यतृतीयेची सोने खरेदी हुकली होती. त्यामुळे आता त्याची कसर दसऱ्यात भरून निघण्याचे चिन्हे आहेत. पुढे दिवाळीनंतर लग्न सराई असल्याने ग्राहक सोने-चांदी खरेदीसाठी सज्ज दिसत आहेत. यंदा दसऱ्यात अपेक्षेपेक्षा अधिक खरेदी होणार असल्याचे दिसत असून एकूण सर्व सराफा बाजारपेठांत एक हजार कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.

– राजेश रोकडे, संचालक रोकडे ज्वेलर्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 4:37 am

Web Title: gold market expected to have a turnover of rs 1000 crore on dussehra zws 70
Next Stories
1 शासकीय प्रयोगशाळांमध्ये ६१ टक्के करोना चाचण्या
2 आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत महत्त्वाची पदभरती कंत्राटी पद्धतीने
3 आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत अर्थसंकल्प मंजूर
Just Now!
X