सात वर्षांतील आकडेवारी

नागपूर : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या सात वर्षांत तब्बल चार कोटी ९६ लाखांहून अधिक किंमतीचे सोने जप्त करण्यात आले. शिवाय शस्त्रे, मद्य, ड्रोन, सिगारेटही मोठय़ा प्रमाणात जप्त करण्यात आल्या.

सीमा शुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांचे नागपूर विमानतळावर विशेषत: शारजहा, दुबई येथून नागपुरात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष असते. या दोन्ही ठिकाणावरून प्रवासी शरीरात सोने लपवून आणतात. सीमा शुल्क चुकवण्यासाठी असे प्रकार घडतात. २०२० च्या पहिल्याच महिन्यात तीन प्रकरणे उघडकीस आली. १० जानेवारी २०२० रोजी तीन प्रवासी सापडले होते. एकाकडे ९२४.१२ ग्रॅम, दुसऱ्याकडे ३२४.७२ ग्रॅम आणि तिसऱ्याकडे ३२०.०३ ग्रॅम सोने सापडले. या सोन्याची एकूण किंमत ५५ लाख  १२ हजार ५३७ रुपये आहे.

सोने तस्करीच्या सर्वाधिक घटना २०१९ मध्ये उघडकीस आल्या. तब्बल ८ जणांकडून सोने जप्त करण्यात आले, तर २०१८ मध्ये सात प्रकरणे उघडकीस आले. नागपूर विमानतळावर २०१३ ते जानेवारी २०२० या कालावधीत सोने जप्त करण्याचे २५ प्रकार समोर आले. या सोन्याची एकूण किंमत ४ कोटी ९६ लाख ५४ हजार ९६० रुपये होती. याशिवाय विमानतळावर विदेशी सिगारेट, मद्य, मोबाईल फोन, शस्त्र, ड्रोन, एलईडी टीव्ही, जुन्या नोटा, परदेशी चलन जप्त करण्यात आले. ६ नोव्हेंबर २०१८ ला सुमारे साडेतेरा लाख रुपयांच्या  सिगारेट जप्त करण्यात आल्या. ११ फेब्रुवारी २००६ रोजी बंदूक आणि त्याची दुर्बिण जप्त करण्यात आली होती, असा तपशील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना प्राप्त झाला आहे.