News Flash

मालाची आवक घटली, दरवाढीची शक्यता

वाहतूकदारांचा संप;१५ हजार ट्रक उभे; ६० कोटींचा फटका

कापसी मार्गावर आंदोलन करताना मालवाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी.

वाहतूकदारांचा संप;१५ हजार ट्रक उभे; ६० कोटींचा फटका; ट्रक मालकांचे साठ कोटींचे नुकसान

डिझेलला वस्तू व सेवा करात (जीएसटी) समाविष्ट करावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या मालवाहतूकदार संघटनेच्या संपामुळे शहरातील सुमारे १५ हजारावर ट्रकची चाके ठप्प झाली आहेत. सोमवारी संपाचा सलग चौथा दिवस असून आतापर्यंत व्यावसायिकांना ६० कोटींचा फटका बसला आहे.

नागपूर हे मध्यभारतातील मालवाहतुकीचे प्रमुख ठिकाण असून या संपामुळे शहरातील सुमारे १५ हजार ट्रक सध्या उभे आहेत. त्यामुळे सिमेंट, कोळसा, औषध, लोखंड आणि इतर वस्तूंची वाहतूक ठप्प पडली आहे. त्याचा फटका व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. संप आणखी काही दिवस चालल्याने त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ावर होण्याची शक्यता आहे. संपाची झळ भाजी बाजाराला बसली असून आवक कमी झाल्याने दर वाढले आहे. शहरात बंगळुरूयेथून टमाटर, गुजरातवरून औषध, कोलकाता येथून होजिअरी, आंध्र प्रदेशातून नारळ, दिल्ली येथून सफरचंद येत आहे. या मालाची आवक २० तारखेपासून ठप्प आहे. संप जर कायम राहिला तर महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे.

आवक अर्ध्यावर

जरी संप मालवाहतूकदारांचा असला तरी त्याचा फटका शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. चार दिवसांपासून आवक अर्ध्यावर झाल्याने महागाई वाढली आहे. सर्वसामान्यांवर संपाचा प्रभाव पडला आहे. सरकार शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे. जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक रोखली जात आहे. शेतकऱ्यांना माल वेळेवर पोहोचत नसल्याने कळमना बाजारात आवक अर्ध्यावर झाली असून इतर राज्यातून येणारे फळांचे दर वाढले आहेत.    – राजेश छाबरानी, व्यापारी कळमना बाजार

दिल्लीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सरकारच्या प्रतिनिधींसोबत बठक होती. मात्र, सरकारचे प्रतिनिधी आलेच नाहीत. विदर्भातील सर्व जिलतील मालवाहतूकदारांनी संपाला समर्थन दिले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत संप कायम राहील.    – कुक्कू मारवाह, अध्यक्ष नागपूर ट्रकर्स युनिट

संप का?

डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करा, टोल नाक्यांवर होणारी लूट थांबवा, वाढलेले थर्ड पार्टी विमा कमी करा, रस्त्यांवरील कर कमी करा आदी मागण्यांसाठी देशभरातील मालवाहतूकदार संपावर गेले आहेत. संपावर जाण्यापूर्वी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष एस.के. मित्तल यांनी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची  भेट घेतली होती. मंत्र्यांनी तीन महिन्यात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे संघटनेने शुक्रवारपासून संप पुकारला. पहिलेच अनेक उद्योग बंद पडले असल्याने मालवाहतूक कमी झाली आहे, त्यात डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने मालवाहतूक मालकांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे व्यवसायाला संजीवनी देण्याच्या दृष्टीने डिझेलला जीएसटीमध्ये समावेश करणे एकमेव मार्ग असल्याचे मालवाहतूकदारांचे म्हणणे आहे.

कापसी मार्गावर चक्काजाम

आज कापसी मार्गावर नागपूर ट्रकर्स युनिटचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांच्या नेतृत्वात दोन तास चक्काजाम करण्यात आला. यावेळी नागपूरच्या दिशेने येणारे शेकडो ट्रक थांबवण्यात आले. यावेळी पन्नास ते साठ वाहतूकदार चक्काजामसाठी गोळा झाले. मात्र, वेळेवर पोलीस आल्याने त्यांनी रस्ता मोकळा करून दिल्याने वाहतूक सुरळीत सुरू झाली.

खासगी बसेसची माघार

पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घेण्यात यावी आणि या इंधनाचा समावेश जीएसटीमध्ये करण्यात यावा. या मागणीसाठी गेल्या शुक्रवारपासून खासगी वाहतूकदार संपावर गेले आहेत. या संपाला पाठिंबा म्हणून पहिल्या दिवशी खासगी बस संचालकांना बसेस बंद ठेवल्या होत्या. अचानक झालेल्या संपामुळे पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि नांदेडला जाणाऱ्यांची गैरसोय झाली होती, परंतु त्यानंतर खासगी बसेस नियमित रस्त्यावर धावू लागल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2018 12:30 am

Web Title: goods transport association strike due to gst
Next Stories
1 डॉक्टर गैरहजर, खाटांवर रक्ताने माखलेल्या चादरी
2 काश्मीर प्रश्न आता धार्मिक वळणावर
3 स्मार्ट सिटी प्रकल्पाला जर्मनीचे सहकार्य
Just Now!
X