नागपूर : एका मुलीला मारहाण करणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर एका कुख्यात गुंडाने आपल्या साथीदाराच्या मदतीने दगडफेक करून त्यांना जखमी करून शासकीय वाहनांची तोडफोड केली. ही घटना वाडी हद्दीत घडली.
सतीश ताराचंद चन्ने (२७) आणि शैलेश मधुकर काळे (१९) दोन्ही रा. नागोबा मंदिरजवळ, अंबाझरी, अशी आरोपींची नावे आहेत. सतीश चन्ने हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात शंभरावर गुन्हे दाखल आहेत.
सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सतीश आणि शैलेश हे एका मुलीला घेऊन वाडी हद्दीतील वायुसेना गेटच्या मागील रस्त्यावर बसले होते. कसल्यातरी कारणावरून त्यांचा मुलीसोबत वाद झाल्याने दोघांनीही तिला मारहाण करायला सुरुवात केली. कुणीतरी ही माहिती शहर नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच गस्तीवर असलेले पोलीस सुरेश मांढरे व नितीन करडभाजने हे घटनास्थळी गेले. पोलीस त्यांना विचारपूस करीत असताना सतीशने शिपाई नितीनची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे शैलेशने नितीनला पकडून सतीशने मारहाण केली. पोलीस मांढरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता दोघांनीही दोन्ही पोलिसांवर दगडफेक करून त्यांना जखमी केले. त्याचप्रमाणे पोलीस वाहनाच्या काचा फोडून वॉकीटॉकी फोडली. पोलिसांनी नियंत्रण कक्षाला ही माहिती दिल्यानंतर वाडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलीस मांढरे यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून सतीश आणि शैलेश यांना अटक केली.
First Published on July 24, 2019 1:47 am