राजीवनगर परिसरात मध्यरात्री थरार

एका अनोळखी मुलीसोबत सेल्फी काढण्यासाठी एका कुख्यात गुंडाने बारमध्ये गोळीबार केल्याची गंभीर घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवनगरमध्ये घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिहीर मिश्रा (३०) असे आरोपीचे नाव आहे. तो कुख्यात अजनी परिसरातील माया टोळीचा सदस्य आहे. ९ जून २०१४ ला गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सूरज जयस्वाल याचा निर्घृण खून करण्यात आला होता. तो खून माया टोळीने केला. त्या प्रकरणात मिहीर हा आरोपी आहे. रविवारी राजीवनगर परिसरातील झिरोडिग्री बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंटमध्ये राजेश इंद्रपाल कुशवाह (३०) रा. निलडोह हा आपल्या मित्र व मैत्रिणींसह एका मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करीत होता. बारमध्ये पब असल्याने ते सर्व नाचत होते. त्या ठिकाणी मिहीरही एक मुलगी व एका मित्रासह आला. रात्री १.४५ वाजेपर्यंत ते दारू पीत बसले. त्या सुमारास कुशवाह याची एक मैत्रीण मोबाईलने सेल्फी घेत होती. त्यावेळी मिहीर तिच्याजवळ पोहोचला व हात पकडून आपल्यासोबत सेल्फी काढण्याची गळ घालू लागला. तिने विरोध केला. हा प्रकार लक्षात येताच राजेश व त्यांचे मित्र आपल्या मैत्रिणीच्या मदतीसाठी पोहोचले. त्यावेळी मिहीरने आपण गुंड असून आपल्याला ओळखत नाही का, असा सवाल करून स्वत:कडील पिस्तूल काढली व हवेत गोळीबार केला. त्यानंतर मिहीर, मित्र-मैत्रिणीसह निघून गेला. यासंदर्भात राजेशच्या तक्रारीवर एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक बी. एन. गोरवे हे घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मिहीर व इतरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, विनयभंग, जीवे मारण्याची धमकी देणे आणि शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री कशी?

मद्यविक्रीची दुकाने किती वाजेपर्यंत उघडी असावीत, याचे नियम उत्पादन शुल्क विभागाने घालून दिलेले आहे. मात्र, त्यानंतरही पहाटेपर्यंत बार, पब, लाऊंज आदींमध्ये दारूचा पुरवठा करण्यात येतो. त्याचे विपरीत परिणाम नागरी आरोग्यावर पडत असून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होते. त्यामुळे शहरातील बार, रेस्टॉरेंटमध्ये होणाऱ्या मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यासाठी पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.