स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने गोरखधंदा; महिन्याला सुमारे ६० हजार रुपयांचा आर्थिक व्यवहार

मंगेश राऊत, नागपूर</strong>

सीताबर्डीतील जनता चौक ते पंचशील चौकादरम्यान शहीद गोवारी आदिवासी उड्डाणपुलाखाली अवैधपणे वाहनतळ चालवून गुंडांकडून वसुली करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक पोलिसांच्या आशीवार्दाने हा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती आहे.

सीताबर्डीत वाहनतळाची प्रचंड समस्या आहे. व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये पुरेशी वाहनतळाची सुविधा नसल्याने लोक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. रहाटे कॉलनी ते झिरो माईल या चौकांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाखाली जनता चौक ते पंचशील चौकादरम्यान महापालिकेने वाहनतळाची सुविधा निर्माण केली. काही वर्षांपूर्वी महापालिकेने कंत्राट प्रक्रिया राबवून तेथे ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ ही सुविधा दिली. पण, वाहतूक नियमानुसार उड्डाणपुलाखाली वाहनतळ करता येत नाही. त्यामुळे महापालिकेने पुन्हा तेथे कधी पे अ‍ॅण्ड पार्क केलेले नाही. पण, गेल्या काही महिन्यांपासून या उड्डाणपुलाखाली तकिया धंतोली परिसरातील समीर नावाच्या गुंडाने स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून वाहने ठेवण्यासाठी पैसे आकारण्याचा गोरखधंदा सुरू केला. याकरिता त्याने आपल्या परिसरातील काही तरुणांना रोजंदारीवर काम दिले आहे. समीर आणि पोलिसांमध्ये महिन्याला जवळपास ६० हजार रुपयांचा अर्थपूर्ण व्यवहार असल्याने त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नाही.

सोमवारी ‘लोकसत्ता’  प्रतिनिधी तेथे वाहन उभे करण्यासाठी गेले असता एका तरुणाने दुचाकीसाठी दहा रुपये शुल्क आकारले व पावती दिली. पण, बाजूलाच एका स्तंभावर लागलेल्या ‘नि:शुल्क पार्किंग’ फलकाचे फोटो काढले असता आजूबाजूचे सर्व तरुणांनी त्यांना घेरले. ते फोटो डिलीट करण्यासाठी व पावती परत करण्यासाठी दबाव टाकला. नकार दिल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा संपर्क झाला नाही. ही अवैध वसुली कधी थांबणार व स्थानिक पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काही कारवाई होणार की, फ्रेंण्ड्स प्रकरणाप्रमाणे या गुंडांनाही अभय दिले जाईल, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

उड्डाणपुलाखाली ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ अशी योजना राबवता येत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तेथे नि:शुल्क वाहनतळाची सुविधा उपलब्ध केली असून नागरिकांना पैसे देण्याची आवश्यकता नाही. कुणी पैसे घेत असल्यास  त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी.

– शकील नियाजी, कार्यकारी अभियंता, महापालिका.

या उड्डाणपुलाखाली नि:शुल्क वाहनतळ असेल व त्या ठिकाणी अवैधपणे वसुली करण्यात येत असेल, तर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा त्यांच्याशी संबंध असल्यास त्यांना स्पष्टीकरण मागून विभागीय कारवाई केली जाईल. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.

– विनीता शाहू, पोलीस उपायुक्त.