अभियानाला प्रतीक्षा पूर्णवेळ अधिकाऱ्याची

देशभरातील नक्षलवादग्रस्त राज्यांच्या संपर्कात राहून महाराष्ट्रातील नक्षल चळवळ मोडीत काढण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेले नक्षलविरोधी अभियान (एएनओ) काहीसे मागे पडू लागले असून नागपूरनजीकच्या सुराबर्डी येथील एएनओचे मुख्यालय पांढरा हत्ती ठरत आहे.

State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
Lok Sabha elections, physical test,
लोकसभा निवडणुकीमुळे ‘पीएसआय’च्या शारीरिक चाचणी लांबणीवर; एमपीएससीचा निर्णय
Chhagan Bhujbal and anjali damania
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्याला यश, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Rent Control Act 1999 Section 28 ambiguous and unfair to tenants
महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ कलम २८ संदिग्धता आणि भाडेकरूंवर अन्यायकारक

सन १९९२ साली महाराष्ट्रात एएनओची स्थापना करण्यात आली. गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्य़ातील नक्षलवाद लक्षात घेऊन नागपूरजवळच्या सुराबर्डी येथे एएनओचे मुख्यालय निर्माण करण्यात आले. येथे नक्षलवादी चळवळीचा अभ्यास असणारे अधिकारी आणि विशेष कमांडोंची नेमणूक करण्यात आली. एएनओचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षकाचे पद निर्माण करण्यात आले. बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल आदी नक्षलग्रस्त राज्यांच्या नक्षलविरोधी यंत्रणेशी संपर्कात राहून गुप्त माहितीचे आदानप्रदान करणे आणि महाराष्ट्रात फोफावणाऱ्या या चळवळीला थोपविण्याची जबाबदारी एएनओकडे सोपविण्यात आली.

संस्थेच्या स्थापनेनंतर विभागाला चांगले अधिकारी मिळाले. त्या काळात एएनओने अनेक उल्लेखनीय कारवायाही केल्या. १९९५ साली एएनओने गुप्त माहितीच्या आधारावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने नागपुरात अनेक ठिकाणी छापे टाकून नक्षलवाद्यांचा प्रचंड शस्त्रसाठा पकडला होता. एएनओच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुकही झाले होते, परंतु त्यानंतर एएनओला उतरती कळा लागली. २०१३ पासून एएनओला पूर्णवेळ अधिकारीही मिळाला नाही. आता एएनओचा प्रभार नागपूरचे सहपोलिस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांच्याकडे आहे.

राज्य सरकारचेही या यंत्रणेकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. राज्य सरकारच्या दृष्टीने महाराष्ट्रात केवळ गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्य़ातच नक्षलवाद आहे. सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा विकसित शहरांमध्ये नक्षलवाद फोफावत आहे. गडचिरोली, गोंदिया जिल्ह्य़ातील जंगलांमध्ये नक्षल्यांचा सामना करण्यासाठी तेथील यंत्रणा सक्षम असताना अतिशय धोकादायक असलेल्या शहरी नक्षलवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी एएनओला बळकट करण्याची गरज आहे. त्यामुळे सुराबर्डी येथील एएनओचे मुख्यालय केवळ पांढरा हत्ती ठरू नये, यासाठी गृहखात्याने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.

शहरांमध्ये ४८ आघाडय़ा

ग्रामीण भागातून नक्षलवादी चळवळीत जाणाऱ्या युवकांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे नक्षली नेत्यांनी शहरी आणि मागासवर्गीय समाजातील युवकांकडे मोर्चा वळविला आहे. नक्षल चळवळीत भरती करण्यासाठी महाराष्ट्रात विविध नावांनी नक्षल्यांच्या ४८ आघाडय़ा कार्यरत आहेत. या आघाडय़ांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी एएनओवर आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नक्षलवाद पेरण्यास पटाईत असलेला अरुण परेरा २०११ पासून जामिनावर कारागृहाबाहेर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तो मुंबईत असून २०१३ मध्ये शारदाश्रम नावाच्या शाळेत त्याने बैठक घेतली होती. त्यानंतर त्याने जून २०१३ मध्ये पुण्यातही बैठक घेतली. त्यादरम्यान २७ जून २०१३ रोजी महाराष्ट्रातील नक्षलवाद्यांचा मास्टरमाईंड म्हणून प्रसिद्ध असलेला स्टॅनलिस गोन्सालविस उर्फ विक्रम हाही कारागृहाबाहेर पडला. तेव्हापासून हे दोघेही मुंबई, पुणे परिसरात सक्रिय आहेत. त्यानंतर त्यांच्या हालचाली टिपण्यात एएनओला यश आले नाही.

अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार -राजवर्धन सिन्हा

शहरांमध्ये वावरणाऱ्या नक्षलवाद्यांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर अधिकारी नेमण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांना अधिक सक्रिय करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय एएनओने घेतलेला आहे. लवकरच अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात होईल. एएनओचे काम अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया एएनओचे प्रभारी विशेष पोलिस महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.