सेतूत येणाऱ्या अर्जामध्ये त्रुटींचे प्रमाण अधिक

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात विविध प्रमाणपत्रांसाठी येणाऱ्या अर्जाची संख्या उन्हाळ्यात वाढत असून त्याचा निपटारा वेळेत होत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, मात्र या केंद्रात येणाऱ्या अर्जामध्ये अनेक त्रुटी आढळून येत असल्याने ते प्रलंबित राहात असल्याची बाब पुढे आली आहे. अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे योग्य असल्यास त्याचा निपटारा होण्यास विलंब लागत नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.

सामान्यपणे सेतू केंद्रात विविध प्रमाणपत्रासाठी जाणारा व्यक्ती हा प्रथमच जाणारा असतो, ही बाब ओळखूनच जिल्हा प्रशासनाने केंद्रात प्रत्येक प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे जोडावी लागतात याची यादी लावली आहे, त्यानुसार अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही पालकांची म्हणजे अर्जदाराची असते.

अनेक वेळा काही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने किंवा निर्धारित कालावधीतील नसल्याने हाती असलेली कागदपत्रे जोडून दलालांच्या माध्यमातून प्रमाणपत्रासाठी प्रयत्न केला जातो. मात्र कागदपत्राची पूर्तताच केली नसल्याने हा अर्ज फेटाळला जातो व त्याचा नाहक त्रास अर्जदाराला होतो. ही बाब टाळण्यासाठी अर्ज करतानाच आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र

  • अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड प्रमाणपत्र
  • अर्जदाराच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
  • १९६७ चा जातीचा दाखला किंवा रहिवासी पुरावा
  • प्रतिज्ञापत्र/ निवडणूक आयोगाचे ओळखपत्र
  • कर पावती किंवा विद्युत देयक किंवा शिधापत्रिकेची छायांकित प्रत
  • तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
    nag-chart1