माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करुन मी नवनवीन प्रयोग करीत असतो. ते अनेकदा चौकटीबाहेरचे असल्याने कोणी त्यावर विश्वास ठेवत नाही. पण, माझे प्रयोग सुरूच असतात. त्यांच्या पूर्ततेसाठी मी सरकारला अनुदान मागत नाही आणि सरकारची मदतही मागत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

विदर्भ – मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ, आनंद व मूफार्म प्रा. लि. यांच्यात शनिवारी झालेल्या सामंजस्य कराराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वनामतीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा, आनंदचे कार्यकारी अधिकारी अरुण रास्ते आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात सरकार जिथे हात लावते तिथे सत्यानाश होतो, असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी सरकारच्या मदतीबाबत अप्रत्यक्ष शंका उपस्थित करीत चालत्या कामात कोणी अडथळे आणून त्याला पंक्चर करू नका, असे सूचक वक्तव्यही केले.

गडकरी म्हणाले, साखरेचे उत्पादन आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. दुग्ध विकासासोबतच मत्स्य पालनावरही भर दिल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. बायोसीएनजीवर शहरातील बसगाडय़ा चालविल्या जाणार आहेत. मदर डेअरीने मावा ऑरेंज बर्फीचे उत्पादन सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांच्या दूध व संत्र्याला मागणी वाढत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मदर डेअरीने दुग्ध संकलन केंद्र वाढवावीत. शेतकऱ्यांना नवीन रोजगार मिळवून देण्यासाठी वर्धेतील प्रसिद्ध गोरस  बिस्किटांमध्ये विविध चवींचे उत्पादन सुरू करावे, असेही गडकरी यांनी सुचवले.