शहरातील १५४ ठिकाणी भाजपचे आंदोलन

नागपूर : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राज्यातील ग्राहकांना १०० युनिटपर्यंतची वीज नि:शुल्क देऊ, टाळेबंदी काळातील देयक माफ वा त्यात ५० टक्के सवलत देऊ, अवास्तव देयक सुधारून देण्याचे आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्षात आता ते ग्राहकांना देयक भरायला लावत आहेत. यामुळे भाजपने ग्राहकांचे वीज देयक माफ करण्याच्या मागणीसाठी शहरातील १५४ ठिकाणी वीज देयकाची होळी करून सरकारवर संताप व्यक्त केला.

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी ८.३० वाजता मजदूर चौक, महादुला येथे वीज देयकाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ वाजता शहरातील १५४ चौकांमध्ये भाजपच्या स्थानिक आमदारांसह पदाधिकारी व ग्राहकांनी एकत्र येत वीज देयकाच्या प्रतीकात्मक होळ्या पेटवल्या. याप्रसंगी ‘महाआघाडी सरकार मुर्दाबाद, वीज देयक माफ झालेच पाहिजे, १०० युनिटपर्यंतची वीज मोफत मिळायलाच पाहिजे, अवास्तव व चुकीच्या देयकात दुरुस्ती झालीच पाहिजे, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’सह अनेक घोषणा भाजपच्या कार्यकत्र्यांनी दिल्या. पूर्व नागपुरात आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात तर मध्य नागपुरात भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. इतरही ठिकाणी स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले.

भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके म्हणाले, करोना काळात सर्व दुकाने व प्रतिष्ठाने बंद होती. त्यानंतरही या व्यावसायिकांना १५ ते २० हजारांचे देयक दिले गेले. प्रत्यक्षात दुकान सुरू असतानाही पैकी काहींचे देयक दोन हजारावर येत नव्हते. तर घरगुती ग्राहकांचीही स्थिती अशीच आहे. त्यातच कुणीही फुकट वीज देण्याची मागणी केली नव्हती. त्यानंतरही ऊर्जामंत्र्यांनी दिल्लीच्या धर्तीवर १०० युनिट मोफत देण्याची घोषणा केली. त्यानंतर टाळेबंदी काळात देयक माफ वा त्यात ५० टक्के सवलत आणि वाढीव देयकात दुरुस्तीचे आश्वासन दिले. परंतु एकही आश्वासन पूर्ण न करता आता ऊर्जामंत्री ग्राहकांना देयक भरायला लावत आहेत. हा प्रकार चुकीचा असून भाजपचे पदाधिकारी प्रसंगी कायदा हातात घेऊन कारागृहात जातील. परंतु वीज देयकाच्या विषयावर ग्राहकांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा इशाराही दटके यांनी दिला.

आंदोलनात शासनाच्या नियमांकडे डोळेझाक

जिल्ह्यातील शहर व ग्रामीणच्या विविध भागात झालेल्या वीज देयकाची होळी आंदोलनात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासगी डॉ. विकास महात्मे, भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके आणि इतरही लोकप्रतिनिधींसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. परंतु बहुतांश भागात शासनाच्या करोना नियंत्रणासाठी केलेल्या शारीरिक अंतराच्या नियमांकडे अनेकांनी कानाडोळा केल्याचे चित्र होते. तर काही कार्यकत्र्यांनी मुखपट्टी लावली नाही. परंतु भाजपकडून आवश्यक काळजी घेतल्याचा दावा करण्यात आला.