News Flash

वीज चोरी करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांचीही साथ?

नागपूर शहर व ग्रामीण भागात अद्यापही मोठय़ा प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे वास्तव आहे.

खांबावरून जोडणी कापलेल्यांना अनधिकृत पुरवठा

नागपूर शहर व ग्रामीण भागात अद्यापही मोठय़ा प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे वास्तव आहे. वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांसह कायम वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनाही थेट वीज खांबावरून अनधिकृतपणे पुरवठा सुरू करून दिला जात असून ते संबंधित कंपनीच्या वीज कर्मचाऱ्यांची साथ असल्याशिवाय शक्य नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

शहरातील महाल, गांधीबाग, सिव्हिल लाईन्स या तीन भागातील सुमारे साडेपाच लाख ग्राहकांना एसएनडीएल तर काँग्रेसनगर येथील सुमारे १ लाख ३० हजार ग्राहकांना महावितरणकडून वीजपुरवठा होतो. ग्रामीणला सर्वत्र महावितरण वीजपुरवठा करते. सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात वीज चोरी होत आहे. यावर आळा घालण्यासाठी कंपन्यांकडून प्रत्येक वर्षी मोठय़ा प्रमाणावर वीज चोरांच्या विरोधातकारवाई होते. मात्र, त्यानंतरही हव्या त्या प्रमाणात वीज चोरी कमी होत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. या चोरीचा भरुदड इतर सामान्य ग्राहकांना जास्त वीजबिलातून सहन करावा लागतो.

एसएनडीएल आणि महावितरणकडून वीज चोरांवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमानुसार दंड व चोरीच्या विजेचे शुल्क आकारले जाते. ते न भरणाऱ्या ग्राहकांसह वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जातो. आधी हा पुरवठा संबंधित ग्राहकांच्या घरी लागलेल्या मीटरमधून खंडित होत होता, परंतु ग्राहक नियमबाह्य़ मार्गाने वीजपुरवठा पूर्ववत करत असल्याचे पुढे आल्यावर आता थेट खांबावरून वीज खंडित केली जात आहे. त्यावरून वीज चोरी करणाऱ्यांनी अनधिकृत वीजपुरवठय़ाची नवीन युक्ती शोधून काढली आहे. त्यानुसार आता थेट कंत्राटी किंवा कायम वीज कर्मचाऱ्यांचीच मदत हे ग्राहक घेत असल्याच्या तक्रारी आहेत. ग्राहकांकडून पैसे घेऊन कर्मचारी खांबावर चढून खंडित केलेला पुरवठा अनधिकृतपणे सुरू करून देतात. एसएनडीएलसह महावितरणला जिल्ह्य़ात अशी अनेक प्रकरणे आढळली आहेत. या कामात काही कंत्राटदाराचे कर्मचारी आणि खासगी व्यक्तीही काम करत असल्याची माहिती वीज कंपनीकडे आहे. यासंदर्भात एसएनडीएलकडून शहरातील काही पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत, परंतु पोलिसांना अद्याप हा प्रकार करणाऱ्यांचा शोध लागला नाही. वीज चोरीला प्रोत्साहन देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. वीज कंपनीतील अधिकाऱ्यांनीही नाव न सांगण्याच्या अटीवर हा प्रकार होत असल्याचे सांगितले आहे.

संगनमताशिवाय चोरी शक्य नाही

वीज चोरी करणारा व्यक्ती आणि वीज खांबावरील परिपूर्ण माहिती असलेल्या वीज कर्मचाऱ्याच्या संगनमताशिवाय हा प्रकार शक्य नाही. त्यातच शहरातील काही वस्त्यांमध्येही अनधिकृतपणे तारांवर आकोडा टाकणे सुरू आहे. हा प्रकार चुकीचा असून त्याचा भरुदड अप्रत्यक्षपणे प्रामाणिक ग्राहकांवर पडत आहे. वीज कंपन्यांनी तातडीने हा प्रकार करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी.

गजानन पांडे, विदर्भ प्रांत अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 2:16 am

Web Title: government employees involved in electricity theft act
Next Stories
1 चारित्र्यहीन आईमुळे मुलीचा ताबा वडिलांकडे
2 सैनिकाच्या भूतदयेमुळे जखमी गाढव पोहोचले करुणाश्रमात
3 रेल्वेतून अपहरणाचा प्रयत्न
Just Now!
X