24 October 2020

News Flash

राज्यातील ‘माफसू’च्या शिक्षकांबाबत शासनाचा दुजाभाव

‘माफसू’मधील शिक्षकांचे सेवानिवृत्ती वय अद्यापही ६० वर्षे

| September 22, 2020 12:20 am

(संग्रहित छायाचित्र)

देवेश गोंडाणे

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची (माफसू) राज्यात दहा घटक महाविद्यालये असून येथील शिक्षकांना वैद्यकीय आणि कृषी विद्यापीठापेक्षा दुय्यम स्थान दिले जात असल्याचे चित्र आहे.

राज्यात वैद्यकीय आणि दंत व कृषी विद्यापीठांमधील शिक्षकांचे सेवानिवृत्ती वय शासनाने ६२ वर्षे केले. मात्र, भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांची शिफारस असतानाही समकक्ष असलेल्या ‘माफ सू’मधील शिक्षकांचे सेवानिवृत्ती वय अद्यापही ६० वर्षे असल्याने येथील शिक्षकांबाबत शासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप आहे. सध्या विद्यापीठात शेकडो रिक्त पदे असल्याने शासनाने ‘माफसू’मधील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ वर्षे करावी, अशी मागणी येथील शिक्षक संघटनांनी शासनाकडे लावून धरली आहे.

शासनाने यापूर्वी वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील शिक्षकांचा अनुशेष विचारात घेऊन त्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे केले आहे. राज्यातील कृषी तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या मानकानुसार कार्यरत आहे. सध्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद येथील समकक्ष दर्जाच्या संशोधकांचे सेवानिवृत्तीचे वय यापूर्वीच ६२ वर्षे केलेले आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ येथील विद्यापरिषद तसेच कार्यकारी परिषदेने यापूर्वीच तसा सदर ठराव घेतला असून  तो शिफारशीसह राज्य शासनास जून २०१९ रोजी सादर केलेला आहे. असे असतानाही कृषी विद्यापीठांतर्गत शिक्षकांना सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ करतेवेळी समांतर असलेल्या महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील शिक्षकांचे  सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केलेला नाही.  छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र , उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये संबंधित विद्यापीठात निवृत्तीचे वय ६२ ते ६५ वर्षे आहे.

रिक्त पदे

माफ सूमधील विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व समकक्ष दर्जाच्या अनुभवी शिक्षक अधिकाऱ्यांच्या मंजूर ११ पदांपैकी १० पदे रिक्त आहेत. तसेच विद्यापीठांतर्गत असलेल्या सर्व दहा घटक महाविद्यालयाच्या प्राचार्याची सर्व पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तसेच तत्सम दर्जाच्या अनुभवी शिक्षकांची ११६ पैकी ११० पदे व १८० पैकी १२० पदे रिक्त आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 12:20 am

Web Title: government grievances against teachers of maharashtra university of animal and fisheries sciences in the state abn 97
Next Stories
1 दर्जेदार हॉटेल साहित्यिकांसाठी ‘जीवनावश्यक’!
2 शेतकऱ्यांबाबत शिवसेनेचे धोरणच नाही
3 RSS मुख्यालयातील नऊ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण
Just Now!
X