मध्य भारतातील अत्यवस्थ गरीब रुग्णांच्या उपचाराचे प्रमुख केंद्र असलेल्या नागपुरातील मेडिकल, सुपरस्पेशालिटी या शासकीय रुग्णालयात  केवळ चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. रक्तसाठा न वाढल्यास येथील स्थिती बिघडून त्याचा फटका रुग्णांना बसण्याची शक्यता आहे.

नागपूरसह राज्याच्या विविध भागात करोनाचा प्रकोप थोडा कमी झाल्याने करोनेतर म्हणजे अपघात, हृदय, मूत्रपिंडसह इतरही आजारांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. यातील अपघातग्रस्त विविध शल्यक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना रक्ताची गरज भासते. परंतु करोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने इतर अनेक शासकीय व खासगी कार्यालयांवर कर्मचारीसंख्येची मर्यादा आल्याने  रक्तदान शिबीर बंद झाले आहेत तर दुसरीकडे  मेडिकल, सुपरस्पेशालिटी रुग्णालयांत मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश येथून उपचाराला येणारे  करोनतेर रुग्ण वाढत आहेत. अशा स्थितीत रक्तसाठा कमी असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त झालेल्या रक्तदानामुळे मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी रुग्णालयांत प्रत्येकी १०० ते दीडशे पिशव्या रक्त उपलब्ध झाले. त्यानंतरही मेडिकल, सुपरचा साठा चार दिवस पुरेल एवढाच आहे. या माहितीला मेडिकल, मेयोच्या काही अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.  मेडिकलचे डॉ. संजय पराते व मेयोचे डॉ. बलवंत कोवे यांनी मात्र बोलण्यास नकार दिला.

मेयोचा भार मेडिकलवर

मेयो रुग्णालयातील सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये कोविड रुग्णालय उभारले गेले. येथे अनेक विभागाचे शल्यक्रियागृह होते. त्यामुळे इतर विभागातील शस्त्रक्रियागृहात निवडक शस्त्रक्रिया वगळता इतर रुग्णांना मेडिकलला पाठवले जाते. त्यामुळे मेडिकलवर कामाचा भार वाढत आहे. मेयोत शस्त्रक्रियांची संख्या कमी झाली आहे.

रक्तसाठय़ाची सद्यस्थिती

मेयो रुग्णालयात ७ डिसेंबरला २१५ पिशव्या  तर मेडिकलमध्ये ५ डिसेंबरला २४ पिशव्या रक्त उपलब्ध होते. याशिवाय प्लाझ्मा स्वतंत्र केलेले १०३, प्लेटलेट वेगळे केलेले २२, पीआरसी गटातील ३६ पिशव्या रक्त उपलब्ध होते.