महेश बोकडे

मेडिकल वगळता नागपुरातील सर्व शासकीय रुग्णालयांत व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार तज्ज्ञांचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांना व्यायामाची सुविधा उपलब्ध होत नाही. मेडिकलमध्येही निम्म्याहून कमी रुग्णांना ही सुविधा मिळत नसल्याने  येथील रुग्णांचे विविध दुखणे वाढण्याचा धोका आहे.

राज्यात केवळ मेडिकलमध्ये व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांसह विद्यार्थ्यांची चमू उपलब्ध आहे.  मेडिकलमध्ये रोज सुमारे १,३०० हून अधिक आंतरुग्ण उपचार घेत असतात. त्यातील अस्थिरोग विभागासह इतरही काही विभागांत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांकडून व्यायाम करवून घेतला जातो. परंतु येथील रुग्णांच्या तुलनेत व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार तज्ज्ञांची संख्या कमी आहे. ट्रामा केयर सेंटरमध्येही या तज्ज्ञांची दोनच पदे मंजूर आहेत.  त्यामुळे रोज अनेक रुग्णांना व्यायामापासून वंचित राहावे लागते. मेयो येथे त्याहून गंभीर स्थिती आहे. येथे व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार तज्ज्ञांची दोनच पदे मंजूर आहेत. त्यांच्याकडून येथे केवळ बाह्य़रुग्ण सेवा दिली जाते. त्यामुळे अस्थिरोग विभागासह इतर वार्डात दाखल  रुग्णांच्या व्यायामाची सोयच येथे उपलब्ध नाही. वार्डात रुग्णांकडून व्यायाम करवून घेतला जात नसल्याने येथील अस्थिरोग, पक्षाघातसह इतर रुग्णांची प्रगती संथ होते. डागा, सुपरस्पेशालिटी, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर महापालिकेच्या विविध रुग्णालयांतही स्थिती यापेक्षा वेगळी नाही.

जास्त काळ दाखल रुग्णांना सर्वाधिक त्रास

पक्षाघात आणि मेंदूशी संबंधित आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णाला व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार तज्ज्ञांकडून व्यायाम आवश्यक आहे. या तंत्रावरच त्याची वैद्यकीय प्रगती अवलंबून असते. व्यायामात कुचराई झाल्यास काहींना कायमचे अपंगत्व येते. छातीत संसर्ग असलेल्या रुग्णालाही विशिष्ट व्यायामाची गरज असते. जास्त काळ  अंथरुणाला खिळलेल्या रुग्णालाही व्यायाम आवश्यक असतो. व्यायामाकडे दुर्लक्ष झाल्यास या रुग्णाच्या हातापायाच्या हाडांची हालचाल कमी होणे.

शासकीय रुग्णालयांत तज्ज्ञांची संख्या कमी असल्याने रुग्णांच्या व्यायामाकडे दुर्लक्ष होणे चुकीचे आहे. प्रत्येक शासकीय रुग्णालयांत शासनाने व्यवसायोपचार व भौतिकोपचार महाविद्यालय सुरू केले व विद्यार्थी संख्या वाढवली तर त्याचा लाभ होईल.

– डॉ. वाय.एस. देशपांडे, माजी राज्य अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन.

काही रुग्णांना व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार तज्ज्ञ वार्डात जाऊन सेवा देतात. येथे विविध प्रशिक्षण घेणाऱ्या या विषयातील काही तज्ज्ञांकडूनही व्यायामाची सेवा दिली जाते. पदे वाढवण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठवला जाईल.’’

– डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता, मेयो