26 November 2020

News Flash

गरीब करोनेतर रुग्णांचा वाली कोण?

मेयोत गैरकरोनाचे सहाशेच्या जवळपास रुग्ण दाखल झाले तर बाह््यरुग्ण विभागात त्याहून अनेक पटीने जास्त रुग्णांवर उपचार झाले.

संग्रहित छायाचित्र

|| महेश बोकडे

शासकीय रुग्णालयांत मध्य भारतातील रुग्ण वाढले; मेडिकल, मेयोत मात्र करोनाच्याच अधिक खाटा

 

नागपूर : करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दुसरीकडे मेडिकल- मेयो या दोन्ही शासकीय  रुग्णालयांत  गैरकरोना रुग्ण वाढले आहेत. परंतु येथे करोना रुग्णांसाठी अधिक खाटा आरक्षित असल्याने गैरकरोना रुग्णांना  लवकर  सुटी दिली जात आहे.  या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून त्याचा फटका येथे उपचार घेणाऱ्या मध्य भारतातील गंभीर गटातील गैरकरोना रुग्णांना बसत आहे. राज्यात केवळ नागपुरात मेडिकल आणि मेयो असे दोन शासकीय वैद्यकीय  रुग्णालये असून येथे विदर्भासह शेजारच्या तीन राज्यातील अत्यवस्थ रुग्ण उपचाराला येतात. सध्या मेडिकलला १ हजार ८०८ तर मेयोला ९५० च्या जवळपास खाटा आहेत. करोनामुळे  मेडिकलला एकूण १ हजार  तर मेयोत सुमारे

६६० खाटा करोना रुग्णांसाठी राखीव आहेत.

ऑक्टोबरपासून मेडिकल, मेयोत बाधितांची संख्या खूप खालावली. १८ नोव्हेंबरला मेडिकलमध्ये २१० तर मेयोत ४५ च्या जवळपासच करोना बाधित तर त्याहून दुपटीहून अधिक इतर आजाराचे रुग्ण दाखल होते.

मेडिकलच्या आकडेवारीनुसार, १ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबरपर्यंत येथील बाह््यरुग्ण विभागात १४ हजार २३५ गैरकरोनाचे रुग्ण आले. यातील  १ हजार ८०८  रुग्णांना दाखल करण्यात आले. तर कोव्हिड ओपीडीत केवळ ४६२ रुग्णांवर उपचार झाले. मेयोत गैरकरोनाचे सहाशेच्या जवळपास रुग्ण दाखल झाले तर बाह््यरुग्ण विभागात त्याहून अनेक पटीने जास्त रुग्णांवर उपचार झाले.  या आकडेवारीवरून करोनाच्या तुलनेत गैरकरोनाचे रुग्ण  अनेक पटींनी वाढल्याचे दिसत आहे.  त्यामुळे गैरकरोनाच्या खाटा  कमी पडत असल्याने येथील रुग्णांना वेळेआधीच सुटी दिली जात असल्याची नातेवाईकांची तक्रार आहे.

मेयोत महत्त्वाच्या शस्त्रक्रियांना थांबा!

मेयोतील कोविड रुग्णालयात सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये सुरू करण्यात आले. या कॉम्प्लेक्समध्येच कान- नाक- घसा यासह अस्थिरोग व इतरही बऱ्याच विभागाचे शस्त्रक्रियागृह आहेत. येथे करोनाबाधितांवर उपचार होत असल्याने येथील बऱ्याच शस्त्रक्रिया ठप्प झाल्या. प्रशासनाकडून येथे  अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचा दावा केला जातो. परंतु ही संख्या करोनापूर्वी होणाऱ्या शस्त्रक्रियांच्या तुलनेत फार कमी आहे.

मेयोत गैरकरोना रुग्ण वाढत असून त्यांच्यासाठी तीन वार्ड वाढवले आहेत, शस्त्रक्रियाही सुरू आहेत. दिवाळीत शस्त्रक्रियांची संख्या कमी असली तरी पुढे ती वाढवली जाईल. सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये कोविड रुग्णालय असल्याने तेथे शस्त्रक्रिया करता येत नाही. इतर शस्त्रक्रियागृहांनाही मर्यादा होत्या. परंतु गरजेनुसार शस्त्रक्रियेसाठी सोय केली जाईल. येथे कुणाही गैरकरोना  रुग्णांना अकारण लवकर सुटी दिल्याच्या तक्रारी नाहीत.

– डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता, मेयो रुग्णालय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 1:03 am

Web Title: government hospitals patients in central india increased corona virus infection akp 94
Next Stories
1 ऊर्जा खात्याच्या अनुदानाची नस्ती मुख्यमंत्र्यांनी फेकली
2 ऑनलाइन वर्ग सुरू असताना अश्लील प्रतिक्रिया
3 पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला डिसेंबरपासून सुरुवात
Just Now!
X