केंद्र व राज्य शासनाकडून राष्ट्रीय खेळाडूंना शासकीय नोकरीसह अनेक आश्वासने दिली जातात, परंतु खेळाकरिता आयुष्य पणाला लावणाऱ्यांकडे आजही दुर्लक्ष होते. नागपुरातील ‘सायकल पोलो’चा राष्ट्रीय खेळाडू शिवराजन नटराजन नाडेमवार सोबतही असेच घडले. त्याने राष्ट्रीय स्पर्धेत अनेक वर्षे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत बरेच विजय मिळवून दिले, परंतु शासनाने त्याला रोजगार न दिल्याने त्यावर ऑटोरिक्षा चालवण्याची वेळ आली आहे. नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयातून त्याला याकरिता संमतीपत्रही मिळाले आहे.

शिवराजन नटराजन, रा. पीटीएस क्वार्टर क्र. १६, चंदननगर, नागपूर याला वयाच्या पंधराव्या वर्षांपासून ‘सायकल पोलो’त रुची निर्माण झाली. शिवराजन याचे वडील शिवणकाम करत असून आई नागपूरच्या मेडिकलमध्ये लहान मुलांचे कपडे विकते. या दोघांच्या अल्प उत्पन्नावर नटराजन यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो.

घरची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही आई-वडिलांनी शिवराजनवर कमी वयात काम करण्याकरिता ताण दिला नाही. शिवराजनला सायकल पोलो या खेळात रुची असल्याने तो नित्याने त्याचा सराव करू लागला. त्यामुळे काही वर्षांतच तो या खेळात तरबेज झाला.

स्वत:च्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर त्याने गेल्या वीस वर्षांत नागपूरच्या संघाकडून राज्यस्तरीय अनेक सायकल पोलोच्या स्पर्धामध्ये सहभाग घेऊन अनेक विजय मिळवले. त्याचा उत्कृष्ट खेळ बघता त्याची राज्यस्तरीय चमूतही कमी वयातच निवड झाली. त्याने महाराष्ट्राच्या संघाकडून राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धेत सहभाग घेऊन राज्याला अनेक विजय मिळवून दिले.

२००७-०८ साली राजस्थानच्या डूडलोड येथे झालेल्या सिनियर (मेन्स) नॅशनल सायकल पोलो चॅम्पियनशीपमध्ये त्याने राज्याला प्रथम पुरस्कार मिळवून दिला. याप्रसंगी त्याला देशातील तीन सवरेत्कृष्ट खेळाडूंपैकी एक म्हणून पुरस्कृत करण्यात आले. शिवराजनने इतरही ज्युनियर, सेमी ज्युनियरसह सिनियर गटात अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.

खेळताना त्याचे वय वाढण्यासह शिक्षणाकडेही दुर्लक्ष झाले. खेळाच्या नादात त्याने बारावी पास झाल्यावर शिक्षणही सोडले. वयाच्या तिसीनंतर त्याच्या घरात जास्तच आर्थिक चणचण जाणवू लागली. त्यातच शिवराजनचे लग्न झाले. कुटुंबाची आर्थिक चणचण दूर करण्यासाठी त्याने शासकीयसह खासगी कंपन्यांमध्ये नोकरीकरिता बरेच प्रयत्न केले, परंतु रोजगार मिळाला नाही. तेव्हा मिळेल ते खासगी काम तो करत आहे.

नोकरी मिळत नसल्याने कुटुंबाला आर्थिक अडचणीतून काढण्यासाठी त्याने ऑटोरिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन ऑटोरिक्षासाठी घेतलेल्या मराठीच्या तोंडी परीक्षेत तो पासही झाला. त्याला नवीन ऑटोरिक्षाच्या परवान्यासाठी संमतीपत्र मिळाले असून लवकरच तो ऑटोरिक्षा घेऊन नागपूरकरांना प्रवासी सेवा देणार आहे.

शिवराजन १९९८-९९ मध्ये दहावीत असताना एका विषयात नापास झाला. घराजवळ राहणारे कमलाकर गोडबोले हे सायकल पोलो खेळत असताना त्यालाही सराव बघण्याकरिता घेऊन जाऊ लागले. याप्रसंगी सायकल पोलोत रुची निर्माण झाल्याने तोही सराव करू लागला. पंधरा दिवसांच्या सरावानंतर राजस्थानला राष्ट्रीय स्पर्धेकरिता कमलाकर गोडबोले खेळण्यासाठी जात असताना क्रीडापटू कमी असल्याने शिवराजनलाही सोबत नेण्यात आले. या स्पर्धेपासून शिवराजनला सायकल पोलो स्पर्धेत रुची निर्माण झाल्याने तो नित्याने खेळू लागला.कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे. ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबत वेळ मिळाल्यास माझ्या जीवनाचे अभिन्न अंग असलेल्या सायकल पोलो स्पर्धेतही खेळण्याचा प्रयत्न करेल. शासनाने माझ्यासह विविध खेळात आपले जीवन पणाला लावणाऱ्या खेळाडूंना रोजगार द्यावा, जेणेकरून खेळाडूला त्याच्या कुटुंबाची चिंता राहणार नाही, असे मत शिवराजनने व्यक्त केले.